भाजपचा येत्या निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करा : खासदार बाळु धानोरकर

पोंभुर्णा/गोंडपिपरी (प्रतिनिधी) :- मागील पाच वर्षात विकासाचा फुगा भाजप नेते करीत आहे. परंतु महागाईचा व्यतिरिक्त सामान्य माणसाला काहीच दिले नाही. गावापासून ते शहरापर्यंत बदल घडवायचा असेल तर काँग्रेसला एकहाती सत्ता द्या, विकास करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार सक्षम आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात विविध योजनांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाचा विकास होण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. येत्या काळात होणाऱ्या नगर पंचायत निवडणुकीत पोंभुर्णा आणि गोंडपिपरी येथे भाजपचा करेक्ट कार्यक्रम करून काँग्रेसला एकहाती सत्ता देण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे. ते पोंभुर्णा व गोंडपिपरी येथील पदाधिकारी कार्यकर्ता, मेळाव्यात बोलत होते.

यावेळी जिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे, जिल्हा मध्यवर्ती  सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे, मुलचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनूरकर, पोंभुर्णाचे तालुकाध्यक्ष कवडू कुंदोजवार, राकेश रत्नावार, उमेश पदमगिरवार, सुरेश चौधरी, चिमुरकर, तुकाराम झाडे, देवेंद्र बाट्टे यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, दोन वर्षात मोठ्या प्रमाणात या भागात निधी खेचून आणण्यात यश आले आहे. यापुढे देखील या क्षेत्राचा विकास करण्यास आम्ही कटिबद्ध राहू. त्याकरिता जनतेने काँग्रेसचा हातात सत्ता देण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे म्हणाले कि, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवून नागरिकांमध्ये सरकारप्रती आत्मीयता निर्माण करावी, तसेच निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवा असे आवाहन त्यांनी केले.