कुष्ठरोग्यांचा प्रश्न शारीरिक व्याधीपुरता मर्यादित नाही, तर त्यांच्या कर्तृत्वाला जगासमोर आणण्याचे कार्य बाबा आमटे यांचे : रवि शिंदे

श्रद्धेय बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त छायाचित्र प्रदर्शनी
अतुल कोल्हे (भद्रावती) : कुष्ठरोग्यांचा प्रश्न त्यांनी केवळ शारीरिक व्याधीपुरता मर्यादित नाही, हा त्यांच्या कर्तृत्वाचा मोठा विशेष आहे. समाजाच्या मरतुकड्या दयेवर या व्याधितांनी जगावे, हे त्यांना रुचले नाही. जगाच्या दृष्टीने या मोडक्या-तोडक्या झालेल्या माणसांच्या पुरुषार्थाला साद घालून त्यांनी माळरानावर नंदनवन निर्माण केले. भग्न मंदिरातही जागृत दैवत असू शकते, हे त्यांनी अंत:स्फूर्तीने जाणले व आपले जीवन या लोकांसाठी पणाला लावले. लोकांनी त्यांना स्वप्नाळू’, ‘ध्येयवादी’ अशी विशेषणे बहाल केली. परंतु त्यांनी आपल्या स्वत:च्या अंतरात्म्याला साद दिली. त्यांनी आपले समाजकार्य नेटाने सुरू ठेवले. तेव्हा एकदाही मागे वळून पाहिले नाही, असे वक्तव्य स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रवि शिंदे यांनी केले.

विश्वविख्यात समाजसेवक श्रद्धेय मुरलीधर देविदास आमटे यांच्या 107 व्या जयंतीनिमित्त आनंदवन मित्र मंडळ वरोरा तर्फे रविवारी 26 डिसेंबर 2021 रोजी महारोगी सेवा समिती आनंदवन संचालित विविध प्रकल्पांचा सात दशकाचा आढावा देणारी दोन दिवसीय चित्रप्रदर्शनाचे आयोजन वरोरा शहरातील गांधी उद्यान मध्ये करण्यात आले आहे.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपुरचे संचालक रविंद्र शिंदे, महारोगी सेवा समितीचे सचिव विकास भाऊ आमटे, मुख्य अतिथी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, विशेष अतिथी सोमनाथ रोडे, प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपाणी, पारस ऍग्रो चे संचालक अमोल मूथा यांची उपस्थिती होती.
यावेळी बाबा आमटे यांच्या जीवन परिचयाची माहिती मान्यवरांनी आपल्या भाषणातून दिली. विकास आमटे यांनी बाबा आमटे यांच्या जीवनातील संघर्ष व तात्कालीन महारोगी रुग्णांची व्यथा त्यांनी मांडली. अजूनही 119 कायदे महारोगी रुग्णांच्या विकासासाठी अडचण ठरत असून त्यांच्या या न्याय हक्कासाठी समाजाने पुढे येण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.