गाव स्वच्छतेसाठी कोसंबीचे नागरीक सरसावले

उच्च शिक्षीत सरपंचामुळे नागरीक एकवटले
✍️ नुतन गोवर्धन, मूल
स्वच्छतेचे महत्व ग्रामीण भागातील नागरीकांना कळावे यासाठी शासन स्तरावर विविध स्पर्धेचे आयोजन केल्या जाते. यास्पर्धेत तालुक्यातील अनेक गावे सहभागी होवुन पुरस्कारही मिळविण्यात यशस्वी होत आहे, मूल तालुक्यातील मौजा कोसंबी ग्राम पंचायतीनेही संपुर्ण गावकऱ्यांना एकत्र करून श्रमदानातुन गाव स्वच्छ करण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी नागरीक मोठया उत्साहाने याश्रमदानात सहभागी होत आहे.

7 सदस्य संख्या असलेल्या ग्राम पंचायत कोसंबी येथे रविंद्र कामडी हे फेब्रुवारी 2021 मध्ये सरपंच पदावर विराजमान झाले, उच्चशिक्षीत सरपंच म्हणुन त्यांच्याकडुन गावाच्या विकासाची अपेक्षा नागरीक करू लागले आहे, त्याच्या खांदयाला खांदा लावुन ग्राम पंचायतचे सचिव सुरज आकनपल्लीवार यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. उपसरपंच सारीका गेडाम, ग्राम पंचायत सदस्य मनिष चौधरी, चंदा कामडी, रोशनी मोहुर्ले, इरूणा वाढई, सुवर्णा कावळे यांच्याकडुनही नेहमीच सहकार्य होत आहे.

ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य तसेच जीवनस्तर उंचावण्यासाठी शासनाच्या वतीने ‘ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा, आर आर आबा पाटील सुंदर ग्राम स्पर्धा अशा अनेक स्पर्धा गावखेडयाच्या विकासासाठी भर देत आहे. ग्रामस्थांत स्वच्छतेची आवड निर्माण होण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास मंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू केले होते. याअभियानात नागरीक स्वतःहुन सहभागी होत असल्यचे दिसून येत आहे.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत घर, परिसर स्वच्छता, सजावट स्पर्धा, जागतिक हात धुवा दिन, रस्ते दुरूस्ती, स्वच्छता, सफाई, स्वच्छ जनावरे, आदर्श गोठा, पाणी शुध्दता, सांडपाणी व्यवस्थापन यासंबंधी चांगले उपक्रम राबविण्यात येत असुन कोसंबी हे गांव 100 टक्के हागणदारीमुक्त आहे, प्रत्येक कुटुंबियानी 100 टक्के नळजोळणी सारखे उपक्रमात सहभागी झाले आहे.

गावात शौचालय व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता आणि पाणी व्यवस्थापन, श्रमदानातुन गाव परिसर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता ठेवण्यात येत आहे. यासाठी नागरीक स्वत:हुन पुढाकार घेत असल्याचे गावकऱ्यांनी सांगीतले.

गावाच्या विकासासाठी नागरीकांचा पुढाकार आवश्यक – सरपंच रविंद्र कामडी
स्वच्छतेतुन समृध्दीकडे वाटचाल करण्यासाठी ग्राम स्तरावर स्वच्छता अभियाना राबविण्यात येत आहे, याअभियानात कोसंबी ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या नागरीकांनी स्वतःहुन पुढाकार घेत असल्याची माहिती सरपंच रविंद्र कामडी यांनी दिली.