अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

पिकाचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी 
मूल: गेल्या महिण्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे उभे असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झालेले असतानाच रविवारी आणि सोमवारी आलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे रब्बी पिक आणि भजीपाल्याचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मूल तालुक्यातील शेतकरी मोठया प्रमाणावर धान पिकाची शेती करतात, हाती आलेल्या पिकांवर संपुर्ण वर्षभराचे नियोजन केले जाते मात्र यावर्षी मागील महिण्यात आलेल्या अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे  हाती आलेले पिक पाण्यात भिजले, दरम्यान कापुन ठेवलेल्या सरडया पाण्यात भिजल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, त्यांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही आणि परत अवकाळी पावसाचे आगमन झाले आणी रब्बी पिकासह भाजीपाला उत्पादकांचेही मोठे नुकसान झालेले आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्व्हे करण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री नामदार दादाजी भुसे चंद्रपूर आणि गडचिरोलीचा दौरा करून गेले, परंतु शेतकऱ्यांच्या पदरी अजुनही नुकसान भरपाई मिळालेली नाही, यामुळे शेतकऱ्यांच्या मनात शासनाप्रती रोष व्यक्त केल्या जात आहे.

शासनाने तात्काळ नुकसान भरपाई दयावी: मंगेश पोटवार
अवकाळी पावसामुळे रब्बी आणि भाजीपाला उत्पादकांची मोठी नुकसान झालेली आहे, केवळ भाजीपाला विक्री करून जिवन जगणाऱ्या शेतकऱ्यांना यापावसाचा चांगलाच फटका बसलेला आहे, जिवन जगण्याचा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे यामुळे शासनाने शेतीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई दयावी अशी मागणी भाजीपाला उत्पादक मंगेश पोटवार यांनी केली आहे.