सोमवार पासून वाजणार शाळेची घंटी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली हिरवी झेंडी

मुंबई: महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरु करण्याच्या निर्णयासंदर्भात माहिती दिली आहे. सगळ्यांचं मत शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर द्यावेत, असं होतं.

कालचं त्यासंदर्भातील फाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली होती. शाळा 24 जानेवारीपासून सुरु करण्याची विनंती त्यांना केली होती. त्यांनी त्या फाईलला मंजुरी दिली आहे. ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल तिथं 24 जानेवारी पासून शाळा सुरु होतील. शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीचं पालन करुन निर्णय घेतील. सोमवारी 24 जानेवारीपासून शाळा सुरु होतील. पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होतील पूर्व प्राथमिक वर्ग देखील सुरु होतील, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता हे आमचं प्राधान्य राहिलेलं आहे. स्थानिक स्थितीवर लक्ष ठेवलं पाहिजे. कोरोना स्थितीचा आढावा घेतला पाहिजे. शाळा सुरु करत असताना आपण गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग पाहत आहोत. त्यामुळं शाळा सुरु करत असताना नियमावलीचं पालन केलं पाहिजे. पूर्णपणे काळजी घेऊन शाळा सुरु करण्यात याव्यात असं, वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. पालकांची समंती असल्यानंतर विद्यार्थी शाळेत येतील. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, याची काळजी आम्ही घेत आहोत.