चंद्रपुरच्या सैनिकी शाळेसाठी 30 कोटी रुपये निधी मंजूर

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित

चंद्रपूर (प्रतिनिधी) : माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सैनिकी शाळेसाठी 30 कोटी रु निधी मंजूर करण्यात आला आहे. आपल्या स्वप्नपुर्तीचा मार्ग अधिक प्रशस्त व्हावा यासाठी आ. मुनगंटीवार सातत्याने प्रयत्नशील आहे.

चंद्रपूर महाराष्ट्रातील पराक्रमी वाघांचा जिल्हा गोंड राज्याच्या राजधानीचा जिल्हा.चंद्रपुर हा लढवय्या आदिवासींचा जिल्हा. या जिल्ह्यातून शेकडो तरुण सैन्यदलात सीमेवर तैनात आहेत. जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज पडली तेव्हा तेव्हा सह्याद्रीने मदत केली असे म्हटले जाते.या जिल्ह्याने देखील देशाला गरज असेल त्यावेळी प्रत्यक्ष सीमेवर लढण्याचा, मदतीला धावून जाण्याचा आपला बाणा कायम राखला आहे. राज्याचे माज़ी अर्थमंत्री तथा विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या देशाभिमानी नेतृत्वाने चंद्रपूरच्या पराक्रमाला लष्करी शिक्षणाची जोड देत एक सैनिकी शाळा अथक पाठपुराव्यातून उभी केली आहे.

सैनिक सर्वांसाठी अत्यंत आदराचे स्थान असणारे व्यक्तिमत्त्व. या देशाची आन-बान शान या देशाचे सैन्यदल आहे. आता या सैनिकी शाळेतून उद्याचा भारत मजबूत सुरक्षित आणि जागतिक महासत्ता बनविण्यासाठी सैन्यदलाचे अधिकारी या ठिकाणाहून तयार होणार आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे चंद्रपूरची सैनिकी शाळा. भारतात आजमितीला असणाऱ्या २९ सैनिकी शाळांपैकी अतिशय उत्तम अशी वास्तू चंद्रपूरमध्ये पूर्ण झाली आहे. पहिली ६ व्या वर्गाची तुकडी जून २०१९ पासून दाखल झाली आणि आज ही सैनिकी शाळा वेगाने प्रगतीकड़े वाटचाल करीत आहे.भारतातील सर्वोत्तम सैनिकी शाळा म्हणून ही शाळा नावारूपास येईल अशा शुभेच्छा चंद्रपूरच्या सैनिकी शाळेला लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी दिल्या आहेत. मुळात या सैनिकी शाळेची संकल्पना लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनीच आ. मुनगंटीवार यांना सूचविली आणि मंत्रीपदाच्या कार्यकाळात मुनगंटीवारांनी या संकल्पनेला मूर्त रूप दिले. एखादा राष्ट्रीय स्तरावरचा प्रकल्प आपल्या मतदारसंघात असावा या महत्त्वाकांक्षेतून सैनिकी शाळेचा प्रवास सुरू झाला आणि बघता बघता चंद्रपूर जिल्हा भारतीय संरक्षण खात्याच्या नकाशावर आला.

चंद्रपूर व बल्लारपूर रस्त्यावरील भिवकुंड जवळील  हिरव्या गार विस्तिर्ण अशा 123 एकरामधील सैनिकी शाळेची वास्तू पूर्णत्वास आली आहे. 4 हजार कामगारांनी अहोरात्र या ठिकाणी काम करून विक्रमीवेळेत सैनिकीशाळा पूर्ण केली आहे. अस्तित्वात असणाऱ्या सर्व सैनिकी शाळांपैकी सर्वात अद्यावत अशी ही इमारत व्हावी यासाठी आ. मुनगंटीवार प्रयत्नरत होते. आज उभी आलेली ही डौलदार शाळा आ. मुनगंटीवार यांचा स्वप्नपूर्ती प्रकल्प आहे. कोणत्याही चंद्रपूरकराच्या नजरेत भरणारा आणि ऊर भरून येणारा हा भव्य प्रकल्प आहे. चंद्रपूरला एका दूरदृष्टीच्या नेत्याने दिलेली ही अमूल्य भेट आहे

विविध आकर्षणांनी नटली सैनीकी शाळा

या सैनिकी शाळेमध्ये भारतातील अद्यावत असे सैनिकी संग्रहालय देखील आहे. विशाखापट्टणम, अमृतसर, महु या ठिकाणी असलेल्या सैनिकी संग्रहालयापेक्षा अधिक उत्तम हे संग्रहालय आहे. ताडोबामध्ये पर्यटनाला येणाऱ्या नागरिकांसाठी या शाळेला भेट देणे एक पर्वणी ठरणार असून विशेष कार्यक्रमाच्या आयोजनाची संकल्पना ठेवण्यात आली आहे. पर्यटकांना सैनिकी शाळेच्या दर्शनी भागांमध्ये भेट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी तयार होणाऱ्या निरीक्षण कक्षातून या संपूर्ण शाळेचे कॅम्पस बघता येते. पर्यटकांना दर्शनी भागांमध्ये देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद वीरांच्या इतिहासाला दर्शविण्यासाठी पुतळे देखील उभे राहत आहेत. या ठिकाणच्या सभागृहामध्ये कारगिल युद्ध, भारताचे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र व नौदलाच्या थरारक प्रात्यक्षिकाचे थ्री डायमेन्शन माहितीपट दाखविण्यात येणार आहे. रणगाडे, विमान, हेलिकॉप्टर या सर्व लढाऊ वस्तू याठिकाणी दर्शनी ठेवण्यात आल्या आहे.

या सैनिकी शाळेच्या कॅम्पसची दर्शनी भिंत ही चंद्रपूरच्या ऐतिहासिक किल्ल्याप्रमाणे  तयार करण्यात आली आहे. ठिकाणी तयार होणारे मैदान हे ऑलिम्पिक दर्जाचे आहे. एक हजार क्षमतेचे प्रेक्षागृह, आधुनिक स्विमिंग टॅंक पासून तर सर्व सुविधा या भारतीय सैन्यदलाच्या मानांकनाप्रमाणे आहेत. सैनिकी प्रशिक्षणामध्ये महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या घोडसवारीच्या संदर्भातही ट्रॅक तयार करण्यात आले असून सैन्यदलाच्या शिफारशीनुसार या ठिकाणी घोडे देखील पुरविले गेले आहे. या ठिकाणी मुलांसाठी अद्यावत वसतीगृह व खानपानाच्या सुविधा असतील याशिवाय या शाळेच्या व्यवस्थापनामधील सर्व पदांसाठी निवासी संकुले देखील उभी झाली आहेत. या सैनिकी शाळेच्या बाहेरील भागात नर्सरी ते पाचवी पर्यतची  शाळा शाळादेखील उभी करण्यात आली आहे. या ठिकाणी काम करणारे कर्मचारी यांच्या पाल्यांसाठी व आजूबाजूच्या परिसरातील गावांतील मुलांसाठीही शाळा चालू राहणार आहे. चंद्रपूरच्या वैभवात भर टाकणारे सैनिकी शाळेची ही वसाहत पूर्णत्वाकडे आली आहे. एका द्रष्टया नेतृत्वामुळे विदर्भ मराठवाड्यातील मुलांना देशासाठी लढण्यासाठी एका दर्जेदार शैक्षणिक संस्थेचा मार्ग मिळाला आहे. आ.मुनगंटीवार यांच्या या दूरदृष्टीचा लाभ पुढच्या अनेक पिढयांना मिळणार आहे.

मुलींच्या प्रवेशाचा मार्ग केला प्रशस्त

या सैनिकी शाळेत मुलींना प्रवेश मिळावा यासाठी आ. मुनगंटीवार यांनी यशस्वी प्रयत्न केले. आता मुली देखील या सैनीकी शाळेत सैनीकी शिक्षण घेवू शकतात. या शाळेत अनेक निर्माणाधीन कामांसाठी निधीची आवश्यकता असल्याने आ. मुनगंटीवार यांनी पाठपुरावा करून 30 कोटी रु निधी मंजूर निधी करविला आहे.