संगणक परिचालकाला ग्राम पंचायतमध्ये बसु देण्यास सरपंचाचा नकार

आपले सरकार सेवा केंद्राचा कामबंदचा इशारा

मूल (प्रतिनिधी) : नागरीकाना शासकीय व इतरही प्रमाणपत्र देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातुन गावागावात संगणक परिचालकाची नेमणुक केलेली आहे, मात्र केळझर येथील सरपंचानी, संगणक परिचालकाला ग्राम पंचायत मध्ये बसुन काम करू देण्यास नकार दिल्याने आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी कामबंदचा इशारा दिलेला आहे.

मूल तालुक्यातील केळझर ग्राम पंचायतमध्ये केंद्रचालक कल्पना डोंगरवार यांनी नेमणुक केलेली असुन त्या मागील अनेक वर्षापासुन त्याठिकाणी कार्यरत आहेत, मात्र 4 फेब्रुवारी रोजी ग्रामसेविका गिरडकर या मंदातुकुम येथे कामानिमीत्य गेल्या होत्या, परंतु ग्राम पंचायतची चाबी सरपंच काजु खोब्रागडे यांच्याकडे दिली होती, दरम्यान संगणक परिचालक कल्पना डोंगरवार यांनी सरपंच काजु खोब्रागडे यांच्याकडे जावुन चाबीची मागणी केली असता, संगणक परिचालक बदलविण्याबाबत ग्राम पंचायतचा ठराव झालेला असुन तसे पंचायत समितीला कळविले आहे असे म्हणुन चाबी देण्यास नकार दिला, सदर माहिती ग्रामसेविकास गिरडकर यांना दिली असता त्यानी मी सुध्दा कर्मचारी आहे, ग्राम पंचायत कमेटीने घेतलेला निर्णय आहे त्यास मी काहीही करू शकत नसल्याचे म्हणुन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलेला आहे.

आपले सरकार सेवा केंद्र चालकांना कार्यालयात बसु न देणे योग्य नसुन शासकीय कार्यालयाची चाबी सरपंचांकडे देऊन कार्यालय बंद ठेवणे हे प्रशासकीयदृष्टया योग्य नाही, यामुळे संबधीतांवर योग्य कारवाई करण्यात यावी, यापुढे अशाच दबाबतंत्राचा वापर करून संगणक परिचालकावर अन्याय केल्यास तालुक्यातील संगणक परिचालक कामबंद आंदोलन करेल असा इशारा महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना तालुका शाखा मूलच्या वतिने संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनातुन केली आहे. यावेळी संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष धनराज रामटेके, उपाध्यक्ष विनोद कोमलवार, सचिव वामन नागापूरे यासह संगणक परिचालक उपस्थित होते.

ग्राम पंचायतच्या ठरावानुसारच :  सरपंच काजु खोब्रागडे

3 हजार लोकसंख्या असलेल्या केळझर ग्राम पंचायतच्या संगणक परिचालक कल्पना डोंगरवार यांच्या कामात वारंवार चुका होत होत्या, त्याना याबाबत खुलासा मागण्यात आला, मात्र समाधानकारक खुलासा न दिल्याने ग्राम पंचायतच्या मासिक सभेत संगणक परिचालक कल्पना डोंगरवार यांना बदलविण्याबाबत ठराव झालेला आहे, सदर प्रकार ठरावानुसारच झाल्याची प्रतिक्रीया केळझरच्या सरपंच काजु खोब्रागडे यांनी दिली.