“त्या” शेतकऱ्याला खरंच न्याय मिळेल का ?

कृषी केंद्र संचालकासोबत कृषी विभागाची “सेटींग” झाल्याची चर्चा

मूल (प्रतिनिधी) : किटकनाशक औषधी फवारणी केल्यामुळे धानपिक जळून शेतकऱ्यांची मोठी नुकसान झाली. यबाबत कृषी विभागाकडे तक्रार केली होती, त्यासोबतच राज्याचे कृषी मंत्री नामदार दादा भुसे यांना भेटून आपबीती सांगताच कृषी केंद्राचा परवाना तात्काळ रद्द करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले मात्र 3 महिण्याचा कालावधी लोटत असताना अजुनपर्यंत कृषी केंद्राचा परवाना रद्द करण्यात आलेला नाही, याबाबत कृषी केंद्र संचालकासोबत कृषी विभागाचे सेटींग झाल्याची चर्चा परिसरात सुरू असल्यामुळे सदर शेतकऱ्याला खरच न्याय मिळेल काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मूल तालुक्यातील फुलझरी येथील शेतकरी रघुनाथ मोहुर्ले यांच्या पत्नीच्या नावाने असलेल्या 0.66 हे. आर. शेतात धान पिकाचे उत्पादन घेत होते. धानपिकावर खोडकिडयाने आक्रमण केल्याने त्यांनी चिरोली येथील एका कृषी केंद्रातुन किटकनाशक खरेदी करून फवारणी केली. दरम्यान काही दिवसात उभे असलेेले धानपिक जळुन खाक झाले. याबाबत जितेंद्र आव्हाड युवा मंचचे जिल्हाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी 25 ऑक्टोबर रोजी प्रशासनाकडे तक्रार केली होती, दरम्यान राज्याचे कृषी मंत्री नामदार दादा भुसे यांनी मूल तालुक्यात अवकाळी पाऊसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देण्यासाठी दौरा केला असता सदर शेतकरयाने मंत्रीमहोदयाना मूल येथील विश्रामगृहात भेट घेऊन आपबिती कथन केले, यावेळी कृषी विभागाला दोन दिवसात परवाना रद्द करण्याचे आदेश दिले, जवळपास 3 महिण्याचा कालावधी पुर्ण होत आहे मात्र सुनावणी घेत असल्याचे कारण पुढे करुन अजुनही परवाना रद्द करण्यात आलेले नाही, यामुळे कृषी केंद्र संचालकासोबत कृषी विभागाची सेटींग झाल्याची चर्चा परीसरात आहे, यामुळे सदर शेतकऱ्याला खरच न्याय मिळेल काय असा प्रश्न उपस्थित करीत कृषी विभागाप्रती रोष व्यक्त केला जात आहे

शेतकरी येताच अंतिम सुनावणी घेऊन निर्णय देऊ : प्रशांत मडावी

धानपिकावर फवारणी करण्यासाठी दिलेले किटकनाशकामुळे उभे पिक जळाल्याची तक्रार प्राप्त झाली असुन त्यानुसार सुनावणी घेण्यात येत आहे, मात्र शेतकरी बाहेरगावी गेल्यामुळे परत आल्यावर अंतिम सुनावणी घेऊ आणि त्यावर निर्णय देऊ अशी प्रतिक्रिया कृषी विभागाचे जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी प्रशांत मडावी यांनी दे धक्का एक्सप्रेस ला दिली.