कचऱ्याच्या ढिगाऱ्यात 5 अविकसित गर्भ आढळले

कथित गर्भपात रॅकेट कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय

नागपूर (प्रतिनिधी) : येथील लकडगंज परिसरात कचर्‍याच्या ढिगाऱ्यात ५ अविकसित गर्भ बुधवारी सायंकाळच्या सुमारास आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सदर माहिती पोलिसांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

नागपूर येथील घटनेसंदर्भात पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, काही स्थानिक नागरिकांना हे ५ अविकसित गर्भ दिसले. या नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला अलर्ट केले. त्यानंतर त्वरीत कारवाई करत लकडगंज पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

सदर घटनेमुळे राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात कथित गर्भपात रॅकेट कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे.