आत्मा योजनेंतर्गत करडई पिक शेतीशाळा शेतीदिन कार्यक्रम संपन्न

शेतकऱ्यांनी करडई पिकाची लागवड करावी : तालुका कृषी अधिकारी कु. मोहीनी जाधव

अतुल कोल्हे भद्रावती :-कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा ) अंतर्गत मौजा काटवल ( तू. ), ता. भद्रावती येथे दि. २२ मार्च रोजी शेतीशाळा शेतीदिन कार्यक्रम घेण्यात आला. रब्बी हंगामामध्ये करडई पिकाचे १० हेक्‍टर क्षेत्रावर २५ शेतकर्‍यांकडे प्रत्येकी एक एकरचे करडई पिकाचे प्रात्यक्षिक राबविण्यात आले. करडई पीक हे शेतकऱ्यांकरिता नवीन असल्यामुळे पिकाच्या लागवड व्यवस्थापन करिता आत्मा योजने अंतर्गत शेतीशाळा राबविण्यात आली पिकाच्या संवेदनशील अवस्थामध्ये दहा वर्गात शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. शेतीशाळेमध्ये पूर्वमशागत, लागवड तंत्रज्ञान, बीजप्रक्रिया पेरणीची पद्धत, आंतरपिके, खत व्यवस्थापन, आंतरमशागत, तण व्यवस्थापन, सिंचन पद्धत, कीड व रोग व्यवस्थापन, कापणी व मळणी या विषयावर मंडळ कृषी अधिकारी चंदनखेडा श्री पी जी कोमटी, कृषी पर्यवेक्षक चंदनखेडा श्री एम एस वरभे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक भद्रावती श्री सुधीर हिवसे, कृषि सेवक काटवल (तू.) कु आर डी गजभे, यांनी वेळोवेळी शेतीशाळेला उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. करडई पिक हे काटेरी असल्यामुळे जंगली जनावरांपासून पिकाचे नुकसान होत नाही त्यामुळे जंगलाला लागून असलेल्या क्षेत्रामध्ये हे पीक लागवड करणे सोयीचे आहे.

करडईचे तेल खाद्यतेल म्हणून वापरात असून करडईच्या तेलामध्ये मानवी शरीराच्या सामान्य वाढीसाठी लागणारी प्रथिने, खनिजद्रव्ये, आणि जिवनसत्वे माफक प्रमाणात आहे. करडईच्या हिरव्या पानामध्ये कॅरोटीन, थायमिन, रायबोफ्लोविन ( जीवनसत्व ब-१२ ), जीवनसत्व ‘क’ असल्यामुळे हिरव्या कोवळ्या पानांचा भाजी म्हणून वापर केला जातो. करडई फुलांच्या पाकळ्यांचा चहासाठी उपयोग असून, रंगनिर्मिती, सौंदर्यप्रसाधने आणि औषधी निर्मितीसाठी वापर केला जातो. करडई पासून तेल काढल्यानंतर राहिलेल्या पेंडीचा किंवा ढेपीचा उपयोग पशुखाद्य म्हणून केला जातो.

करडई हे तेलवर्गीय पीक असल्यामुळे व मानवी आरोग्याला लाभकारी असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड करून तालुक्यातील पेरणी क्षेत्र वाढविण्यात यावे असे तालुका कृषी अधिकारी कु मोहीनी जाधव यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले.

शेतीशाळा यशस्वीरित्या राबविण्याकरिता शामराव श्रीरामे, गणेश सोनुले, ईश्वर ननावरे, आप्पाराव बोथले व नवनाथ धारणे यांनी सहकार्य केले.