महसूल कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही संप

जिल्ह्यातील १५ तालुक्यात नागरिकांची कामे प्रभावित
बेमुदत संपामुळे अडचणी वाढल्या

विसापूर  (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्य शासनाच्या महसूल विभागात अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती मिळावी व अन्य न्याय मागण्यासाठी सोमवार ( दि.४) पासून बेमुदत संप सुरु केला. महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील १५ तालुक्यातील तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय दररोज कामासाठी येणाऱ्या नागरिकांची प्रभावित झाले आहे. यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना मागील दोन वर्षांपूर्वी पासून शासनाकडे प्रलंबित समस्या व न्याय मागण्यासाठी पाठपुरावा करत आहे. मात्र शासनस्तरावर अद्याप दखल घेण्यात आली नाही. शासनाने वेळोवेळी केवळ आश्वासन दिले. कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्याकडे कानाडोळा केला. परिणामी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने सोमवार पासून बेमुदत संप सुरु केला. हा संप मंगळवारी दुसऱ्या दिवशी देखील सुरु होता. राज्य शासनाने महसूल कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा न काढल्यास परिस्थिती गंभीर वळन घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य सरकारने सप्टेंबर २०१९ साली नायब तहसीलदार संवर्गातील सरळ सेवा भरती प्रक्रिया मान्य केली. मात्र त्याचा शासन निर्णय अद्याप काढला नाही. प्रत्येक महसूल विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या पदांचा भरणा तातडीने करावा. महसूल कर्मचाऱ्यांची सुधारित निकषावर पदोन्नती करावी. नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा दिला. परंतु वेतन त्रुटी दूर केली नाही. महसूल कर्मचाऱ्यांच्या हिताचा दांगट समितीचा अहवाल त्वरित प्रसिद्ध करावा. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वर्ग तीन म्हणून पदोन्नती द्यावी. आदी मागण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरु केला आहे.

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष राजू धांडे, जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र धात्रक, उपाध्यक्ष अजय मेकलवार, सरचिटणीस मनोज आकनूरवार, नितीन पाटील, प्रणाली खीरटकर, रिना वेहलेकर, संजना झाडे, सोनाली लांडे, अमोल करपे, अजय गाडगे, सुनील चांदेवार, हेमंत उपरे,राकेश जांभुळकर, विष्णू नागरे आदीच्या मार्गदर्शनात बेमुदत संप केला जात आहे.