चंद्रपूर (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात मार्गदर्शन शिबिर व कार्यशाळेचे आयोजन दि. 12 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत जनता महाविद्यालय, सिव्हिल लाईन, चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.
यानिमित्ताने चंद्रपुर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयामार्फत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कामकाज अधिक पारदर्शक, लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी तसेच अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विज्ञान शाखेच्या इयत्ता 11वी व 12 वी मध्ये शिकत असलेल्या व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना, पालकांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवितांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच विहित कालावधीत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते. याकरिता जात प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात येणाऱ्या अडचणींचा विचार करता मार्गदर्शन शिबिर व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी, जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच जात पडताळणीचा लाभ घेऊ इच्छिणारे नागरिक यांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा. असे आवाहन चंद्रपूर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य विजय वाकूलकर यांनी केले आहे.