शिवसेनेच्या मूल येथील वाघानी केला शिवसेनेला जय महाराष्ट्र!

नितीन येरोजवार यांनी तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा संपर्क प्रमुखाकडे केला सुपुर्द
जिल्हयात शिवसेनेला बसणार मोठा फटका

मूल (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षापासुन तालुक्यात शिवसेनेचा झेंडा स्थानिक स्वराज्य संस्थेवर लहरविण्यासाठी मेहनत घेतलेले शिवसेनेचे मूल तालुका प्रमुख आणि शिवसेनेचा मूलचा वाघ म्हणुन परिचीत असलेले नितीन येरोजवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा चंद्रपूर जिल्हासंपर्क प्रमुख प्रशांत कदम आणि जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे यांच्याकडे सुपुर्द केला आहे.

राज्यात महाविकास आघाडीच्या रूपाने शिवसेनेची सत्ता आहे, शिवसेनेचे सर्वेसर्वे नामदार उध्दव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेले आहेत, त्यांच्या मार्गदर्शनात राज्यात शिवसेना वाढत आहे, परंतु जिल्हयातील अंतर्गत राजकारणामुळे अनेकांना त्यांचा फटका बसताना दिसत आहे, मूल तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासुन नितीन येरेाजवार हे तालुका प्रमुख म्हणुन पदभार स्विकारून स्वखर्चाने तालुक्यातील दोन ग्राम पंचायतवर सरपंच, तीन ग्राम पंचायत मध्ये उपसरपंच तर तब्बल 26 ग्राम पंचायत सदस्य निवडुण आणण्यामध्ये त्यांनी मोलाची भुमिका बजावली आहे.

शिवसेना या पक्षावर नितीन येरोजवार यांची भरपुर निष्ठा आहे .मुल तालुक्यातील कोणत्याही अधिकारी, व्यावसायिक, कंत्राटदार यांना कधीही कोणताही त्रास दिला नाही त्यांची ही इमानदार छबी ही सर्वाचे मन जिंकून घेणारी आहे. त्यांनी पक्षासमोर कधीही पैसा, वेळ यांचा विचार केलेला नाही, तालुका प्रमुखाची जबाबदारी येताच त्यांनी मूल शहरातील प्रत्येक वार्डात तसेच मुल तालुक्यातील जिल्हापरीषद व पंचायत समिती गणामध्ये शाखा गठीत केलेली आहे, काम करीत असताना कार्यकर्त्यांना त्रास होवु नये यासाठी त्यांनी हजारो रूपये खर्च करून बस स्थानकाच्या समोर भव्य असे कार्यालय उभारलेले आहे. यासाठी त्यांनी स्वतःजवळील लाखो रूपये केवळ पक्षासाठी खर्च करीत आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून राजकारणाकडे जास्त आणि कौटुंबिक जबाबदारीकडे दुर्लक्ष झाल्याने गंभीर आजाराला समोरे जावे लागले. त्यासोबतच मूल तालुक्यात सुरू असलेल्या गठबाजीला कंटाळुन शेवटी तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दयावा लागत असल्याची खंत नितीन येरोजवार यांनी दे धक्काशी बोलताना व्यक्त केले.

हिन्दुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती निष्ठा असलेले नितीन येरोजवार यांनी शिवसेना तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिले मात्र निष्ठेप्रती कायम शिवसैनिक म्हणुन काम करणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. त्यांच्या राजीनाम्यामुळे तालुक्यातच नाही तर जिल्हात शिवसेनेला मोठा फटका बसला आहे.