प्रवाशांना करावा लागतो अडचणीचा सामना
विसापूर हाल्ट स्टेशनवर तिकीट घरही बंद
विसापूर (प्रतिनिधी): बल्लारपूर तालुक्यातील विसापूर सर्वात मोठे गाव असून लोकसंख्या १६ हजारावर आहे. विसापूर गोंडवाना रेल्वे स्थानकावर कोरोना काळा पूर्वी वर्धा – बल्लारपूर, गोंदिया – बल्लारपूर ये -जा करणाऱ्या प्रवासी रेल्वे चा थांबा दिला होता. कंत्राटदार मार्फत तिकीट देखील दिले जात होते. आता मात्र गोंदिया -बल्लारपूर प्रवाशी रेल्वेचा थांबाच नाही. तिकीट घरही बंद आहे. परिणामी येथील प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
बल्लारपूर तालुक्यातील गोंडवाना विसापूर रेल्वे हाल्ट स्टेशनवर अलीकडे गाडी क्रमांक ०१३१६ व ०१३१५ वर्धा – बल्लारपूर ये -जा करणारी प्यासेंजर थांबा देण्यात आला. मात्र गोंदिया – बल्लारपूर ये – जा करणारी प्रवासी रेल्वे थांबत नसल्याने गोंदिया कडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
विसापूर गोंडवाना रेल्वे हाल्ट स्टेशन वर कोरोना काळापूर्वी वर्धा – बल्लारपूर, बल्लारपूर – वर्धा, काजीपेठ – नागपूर, नागपूर – काजीपेठ,दुपारी १२.४५ वाजताची गोंदिया -बल्लारपूर,दुपारी २.२० वाजताची बल्लारपूर -गोंदिया,दुपारी ३.४५ वाजता गोंदिया – बल्लारपूर, दुपारी ४.४५ वाजता बल्लारपूर – गोंदिया,रात्री १०.३० वाजताची गोंदिया – बल्लारपूर व सकाळी ५.४५ वाजताची बल्लारपूर – गोंदिया या प्रवासी रेल्वे थांबत होत्या. मात्र कोरोना काळाचे शुक्लकाष्ट लागले आणि विसापूर गोंडवाना हाल्ट रेल्वे स्टेशनवर अवकळा आली. ही अवकळा अद्याप कायम आहे.
विसापूर गोंडवाना हाल्ट रेल्वे स्टेशनवरून मूल, सिंदेवाही, तळोधी, नागभीड, ब्रम्हपुरी, वडसा, गोंदिया कडे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.यामुळे रेल्वे प्रशासनाने गोंदिया -बल्लारपूर प्रवाशी रेल्वेचा विसापूर गोंडवाना हाल्ट स्टेशनवर थांबा द्यावा, अशी मागणी विसापूरकरांनी केली आहे.
विसापूर रेल्वे स्टेशनवर तिकीट घराला मान्यता
विसापूर गोंडवाना हाल्ट रेल्वेस्टेशन वर रेल्वे प्रशासनाने कंत्राटी तिकीट घराला मान्यता दिली आहे. तसे पत्रही आले आहे.बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार व माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृह राज्य हंसराज अहीर यांच्या प्रयत्नामुळे विसापूर गोंडवाना हाल्ट रेल्वे स्टेशन मिळाले आहे. या रेल्वे स्थानकावर अन्य प्रवाशी रेल्वे थांबव्यात यासाठी रेल्वे प्रशासन सोबत पाठपुरावा केला जात आहे. प्रवाशांची गरज लक्षात घेऊन प्रयत्न केला जात आहे.
– श्रीनिवास सुंचुवार
अध्यक्ष, चंद्रपूर -बल्लारपूर रेल्वे प्रवाशी संघटना, बल्लारपूर.






