विसापूर सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी प्रभाकर टोंगे यांची निवड

शेतकरी सहकारी आघाडीची सत्ता
 उपाध्यक्ष पदावर परमेश्वर पुणेकर यांची वर्णी

विसापूर (प्रतिनिधी) : विसापूर सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे यांच्या शेतकरी आघाडीने निर्विवाद सत्ता मिळवली. या संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी बुधवारी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये अध्यक्ष पदी प्रभाकर टोंगे यांची तर उपाध्यक्षपदावर परमेश्वर पुणेकर यांची अविरोध निवड झाली.

सहकार क्षेत्रातील महत्वपूर्ण निवडणुकीत चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामभाऊ टोंगे यांच्या शेतकरी विकास आघाडीने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

बल्लारपूर तालुक्यातील सर्वात मोठे असलेल्या ग्रामपंचायत मध्ये मागील वर्षीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या प्रयत्नामुळे सत्ता मिळाली. त्यानंतर सेवा सहकारी संस्थेत देखील रामभाऊ टोंगे यांच्या शेतकरी विकास आघाडीने सत्ता स्थापन करून गावगाड्यातील राजकारणात आपला दबदबा कायम ठेवला आहे.

विसापूर येथील सेवा सहकारी संस्थेत शेतकरी विकास आघाडीचे शालिकराम भोजेकर, चरणदास डाहुले, रवी हरणे, सुरेश पावडे, शशिकांत पावडे, शेख छोटू दादामिया, प्रभाकर टोंगे, विजय मारोती टोंगे, परमेश्वर पुणेकर,नारायण टोंगे, मीराबाई टोंगे व सिंधू टोंगे यांची संचालक म्हणून अगोदरच अविरोध निवड झाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी एस. आर. सांगोळे यांच्या मार्गदर्शनात बुधवारी विसापूर सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी सभा घेण्यात आली. या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी प्रभाकर टोंगे यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी परमेश्वर पुणेकर यांनी एकमेव अर्ज दाखल केला. दोन्ही पदासाठी अन्य उमेदवारांनी अर्ज दाखल न केल्याने विसापूर सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी प्रभाकर टोंगे यांची तर उपाध्यक्ष पदी परमेश्वर पुणेकर यांची अविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केले.