समाजातील शेवटच्या घटकाला दर्जेदार आरोग्यसेवा देणे आवश्यक

खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते तालुका आरोग्य मेळाव्याचे उदघाटन

चंद्रपूर (प्रतिनिधी) : सर्वसामान्य, गोरगरीब, गरजू रुग्णापर्यंत आरोग्य व्यवस्थेने पोहचून त्यांना सेवेचा लाभ देणे आवश्यक आहे. गरिबातल्या गरिबाला दर्जेदार आरोग्य सुविधा देणे यंत्रणेचे कर्तव्य असून त्यांनी जबाबदारी चोखपणे पार पडली पाहिजे असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.

आजादी का अमृतमहोत्सव साजरा करण्याचा भाग म्हणून वरोरा येथील ग्रामीण रुग्णालय येथे आरोग्य मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी आमदार प्रतिभाताई धानोरकर, तहसीलदार रोशन मकवाने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद्र कन्नाके, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय वरोरा डॉ. अंकुश राठोड, तालुका आरोग्य अधिकारी वरोरा डॉ. बाळू मुंजुनकर, पोलीस उपनिरीक्षक मडावी, संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती वरोरा वानखेडे, सभापती राजू चिकटे, सुभाष दांदडे रोटरी क्लब अध्यक्ष वघले यांची उपस्थिती होती.

जिल्हा रुग्णालयासारख्या सुविधा असलेल्या ग्रामीण रुग्णालयात मेळाव्यानिमित्त विविध आजारांवर तज्ञ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याकडे कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे निदान व त्यावरील पुढील उपचार रुग्णांना मेळाव्यात होत आहे. स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्रतज्ञ, मधुमेहतज्ञ, उच्च रक्तदाब, दुर्धर आजार, संसर्गतज्ञ, असंसर्गतज्ञ आजारांवर निदान व उपचार पद्धतीचा लाभ यावेळी मेळाव्यानिमित्य शेकडो नागरिकांनी घेतला आहे.

त्यासोबतच विविध आजार, आरोग्य व कुटुंब कल्याण कार्यक्रमाबद्दल जागरूकता निर्माण करणे, पात्र नागरिकांना जागरूकता निर्माण करणे, पात्र नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड देणे, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांची माहिती व उपाययोजना इत्यादी कार्यक्रम या मेळाव्याच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे

निरोगी आयुष्यासाठी आरोग्याची तपासणी गरजेचीच : आमदार प्रतिभाताई धानोरकरl

निरोगी आयुष्यासाठी आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. त्याकरिता आरोग्य मेळावा हा चांगला उपक्रम आहे. आरोग्य मेळाव्याचा माध्यमातून जनतेने आपल्या रोगाचे निदान करून उपचार करून घ्यावा असे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.