मधमाशावरून कॉंग्रेस-भाजपामध्ये कलगीतुरा

श्रेय घेण्यासाठी दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांची चळाओढ

मंगेश पोटवार, मूल
करोडो रूपये खर्च करून मूल येथील स्मशानभुमीचे सोंदर्यीकरण करण्यात आले, पण याच स्मशानभुमीतील मोठमोठया वृक्षांवर मधमाशाचे पोळ असल्याने ते अंत्यसंस्कारसाठी आलेल्या नागरीकांना दंश करीत आहे यामुळे मधमाशाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी कॉंग्रेसचे नेते राकेश रत्नावार यांनी केली होती, तर भाजपाचे नेते माजी बांधकाम सभापती प्रशात समर्थ यांनी सोशल मीडियावरील जनतेच्या मागणीमुळे कशाचीही वाट न बघता तात्काळ मधमाशांचे पोळ हटविल्याने आता श्रेय घेण्यावरून कॉंग्रेस आणि भाजपामध्ये कलगीतुरा माजला आहे.

मूल नगर पालीकेतील नगराध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ जानेवारी महिण्यामध्ये संपुष्ठात आला, मागील 3 महिण्यापासुन नगर पालीकेकडुन प्रशासक आणि मुख्याधिकार्याच्या समन्वयातुन कामकाम पार पाडल्या जात आहे. दरम्यान मूल येथील विश्राम गृह मार्गावरील नवभारत विद्यालयाच्या समोर असलेल्या पिंपळाच्या वृक्षावर मधमाशाचे पोळ असल्याने एका मार्गक्रमण करणाऱ्या व्यक्तीला त्यातील मधमाश्यांनी दंश करून गंभीर जखमी केले, सदर व्यक्तीचे उपचारादरम्यान निधन झाले, विशेषतः मूल येथील स्मशानभुमीतील मोठया वृक्षांवरही मधमाशाचे मोठे पोळे आहेत, याठिकाणी अंत्यसंस्कार पार पाडण्यासाठी आलेल्या नागरीकांवर मधमाशानी हल्ला करीत असल्याने अनेकाना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत होते, मात्र स्थानिक प्रशासन याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याने, कॉंग्रेसचे नेते मूल नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष राकेश रत्नावार यांनी मूल नगर पालीकेला निवेदन देवुन तात्काळ मधमाशाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. तर नागरीकांना वारंवार होणारा त्रास दुर करण्याच्या दृष्टीने मूल नगर पालीकेचे माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी प्रशासनाची मदत घेत नवभारत विद्यालयासमोरील पिंपळाच्या वृक्षावरील आणि स्मशानभुमीतील मधमाशाचे पोळ तात्काळ काढले.

सदर मधमाशाचे पोळ काढण्यावरून मूल येथील कॉंग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आमच्याच पक्षाने मधमाशाचे पोळे काढल्याचे सांगुन श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र  हा श्रेयवाद आता कोणते वळण घेते याकडे मूल शहरासतील नागरीकांचे लक्ष लागले आहे.