ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य व जलजीवन मिशनवर फोकस करा : पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर जिल्हा परिषदेचे हिरक महोत्सवी वर्ष

जिल्ह्यातील 300 शाळा अत्याधुनिक करण्याचा मानस

चंद्रपूर (प्रतिनिधी) : महात्मा गांधीजींनी ‘खेड्याकडे चला’ हा संदेश दिला होता. मात्र आपला प्रवास उलट्या दिशेने सुरू आहे. ग्रामीण भागातील लोढा शहरांकडे येत असल्याने शहरांवरचा ताण वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या उपलब्धतेसोबतच, दर्जेदार शिक्षण, उत्तम आरोग्य सुविधा, पिण्याचे शुध्द पाणी आदी बाबी उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने ग्रामीण भागावर फोकस करावा. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून निधीची कमतरता पडू देणार नाही, असे मत राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्या चे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदेच्या कर्मवीर मा.सा. कन्नमवार सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, माजी जि.प.अध्यक्षा संध्या गुरुनुले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, प्रकाश देवतळे उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दोन वर्षानंतर 1 मे रोजी जिल्हा परिषदांची स्थापना करण्यात आली, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या स्थापनेचे हे हिरक महोत्सवी वर्ष आहे. जिल्हा परिषद ही ग्रामीण भागातील विकासाचा कणा मानली जाते. ज्यावेळी जिल्हा परिषदेला चांगले अधिकारी मिळाले, त्या त्या वेळेस जिल्हा परिषदेच्या प्रगतीचा आलेख उंचावला आहे. विकास सुचविणे आणि विकास करून घेणे हे लोकप्रतिनिधीचे काम असले तरी अधिकाऱ्यांनी कायद्याने आणि नियमाने काम करावे.

ग्रामीण भागातील शिक्षणाबाबत पालकमंत्री म्हणाले, शिक्षण हे आपले ‘ॲसेट’ आहे. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील 20 याप्रमाणे 300 शाळा अत्याधुनिक करण्याचा मानस आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेला तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. शिक्षणाबाबत एक मॉडेल जिल्हा उभा करण्यासाठी या शाळांमध्ये डीजीटायझेशन करू. तसेच ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक विषयाचे चांगले शिक्षक नेमावे. त्या त्या विषयातील तज्ज्ञ शिक्षकाद्वारे एकाच वेळी 300 शाळांत ऑनलाईन पध्दतीने शिकविता आले तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षा, नीट, जेईई आदी परिक्षांसाठी विद्यार्थ्यांनी आतापासून एक तास अभ्यास करायला पाहिजे, असे नियोजन करा.

आरोग्याबाबत पालकमंत्री म्हणाले, ग्रामीण भागात आरोग्य विभागाचे बळकटीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम झाले आहे. केवळ इमारती बांधून चालणार नाही तर आरोग्याच्या दृष्टीने अत्याधुनिक उपकरणे, सोयीसुविधा, वैद्यकीय स्टाफ उपलब्ध करून देऊ. तसेच नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळाले तरच आपण निरोगी राहू. जलजीवन मिशन अंतर्गत अनेक पाणी पुरवठा योजना सुरू आहेत. या अंतर्गत करण्यात येणारी कामे दर्जेदार असावी. त्याची तपासणी करण्यात येईल, जिल्हा परिषदेने  शिक्षण, आरोग्य आणि जलजीवन मिशन यावर प्राधान्याने लक्ष केंद्रीत करावे. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीकरीता निधी उपलब्ध करून देऊ, असेही त्यांनी सांगितले.

60 वर्षात जिल्हा परिषदेने या जिल्ह्यात चांगले काम केले. त्यासाठी सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, अधिकारी अभिनंदनास पात्र आहेत. भविष्यातही आणखी चांगले काम करा, अशा सुचना त्यांनी केल्या.

यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले, सद्यस्थितीत 29 पैकी केवळ 14 विषय जिल्हा परिषदेकडे आहेत. जिल्हा परिषदेने योजनांची मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी व जनजागृती करावी. सर्व अधिका-यांमध्ये योग्य समन्वय ठेवून सर्व विभागप्रमुखांचे वर्षातून दोनदा प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. तर प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर म्हणाल्या, जिल्हा परिषदेचा हिरक महोत्सव ही आनंदाची बाब आहे. 60 वर्षात मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी केले. संचालन सावन चालखुरे, तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे यांनी मानले. यावेळी सर्व विभाग प्रमुख तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.