त्या महागड्या वस्तूंचे सुटे भाग उपलब्ध करून देण्यात यावे : दीपक देशपांडे

चंद्रपूर (प्रतिनिधी) : आजच्या आधुनिक युगात सर्वसामान्य माणूस आपल्या घरात नित्योपयोगी वस्तूंमध्ये छोट्यामोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर फार मोठ्या प्रमाणात करीत आहे. त्यांमध्ये फॅन, मोबाईल, मिक्सर ग्राईंडर पासून तर फ्रिज ओव्हन आणि टिव्ही संगणक ते एअरकंडीशनर सारख्या असंख्य वस्तुंचा उपयोग केला जातो.

यासर्व वस्तू बहुतांश त्यांच्या वारंटी फारतर गॅरंटी काळापर्यंत खराब होतच नाही मात्र एकदाचा काय तो काळ संपला की या वस्तूंची कुरबुरी सुरू होते आणि छोट्या छोट्या सुट्या भागांची कमतरता जाणवू लागते आणि हे सुटे भाग बाजारात उपलब्ध नाहीत ही बाब प्रकर्षाने जाणवते, परिणामी अतिशय शुल्लक वाटणाऱ्या कारणांमुळे या छोट्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजूला ठेवून यांच्या सुट्या भागांची शोधाशोध सुरु करावी लागते बरेचदा या कारणांमुळे या इलेक्ट्रॉनिक वस्तू अडगळीत पडतात.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या चंद्रपूर जिल्ह्यातील तुकूम शाखेच्या बैठकीत उपस्थित महिला आघाडी प्रमुख नंदिनी चुनारकर यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली आणि यावर साधकबाधक चर्चा होऊन ही अती सामान्य वाटणारी बाब सर्वसामान्य माणसाला दैनंदिन वापरात येणाऱ्या असंख्य वस्तुंच्या सुट्या भागांची उपलब्धता न झाल्याने पडून राहात असल्याची वास्तविकता पुढे आली आणि ही अतिशय गंभीर बाब उत्पादक व शासनाच्या लक्षात आणुन देणे अतिशय गरजेचे आहे हे लक्षात आले. यात उत्पादक कंपन्यांना फार मोठा फायदा होत असून सामान्य ग्राहकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे व नवीन वस्तू खरेदी करण्याचा आगळाच भुर्दंड सोसावा लागत आहे.
या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा पुरवठा करताना उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या सुट्या भागांची उपलब्धता करुन दिल्यास या महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंटि गॅरंटी काळानंतर ही दिर्घकाळ टिकू शकतात ही बाब जनतेचा कौल घेतला असता पुढे आली आहे.

इलेक्ट्रॉनिक जगतातील, ग्राहक अभ्यासक, उत्पादक,विक्रेते व त्यांची देखभाल दुरुस्ती करणारे मेकॅनिकसह उपभोग घेणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या मनात डोकावून हा विषय चर्चेत आणला असता उपलब्ध प्रतिक्रिया नंतर उत्पादक कंपन्यांनी ह्या वस्तुंच्या सुट्या भागांची उपलब्धता करुन दिलीच पाहिजे असा एकच सूर ऐकायला मिळाला.
परिणामी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने दीपक देशपांडे जिल्हा संघटक, यांनी भारत सरकारच्या ग्राहक कल्याण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राद्वारे जनतेच्या मनात असलेल्या या प्रश्नावर विचार करून तातडीने सर्व उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनाच्या छोट्या मोठ्या सर्व प्रकारच्या वस्तूंच्या लहानसहान वस्तूंच्या सुट्या भागांची उपलब्धता करुन देण्याची विनंती एका निवेदनाद्वारे केली आहे.

दीपक देशपांडे यांनी केलेल्या या मागणीला शासनाने जर गांभीर्याने घेतले आणि उत्पादक कंपन्यांना तसे आदेश दिले तर राष्ट्रीय स्तरावर फार मोठी क्रांती होऊ शकते व घराघरात बेकार म्हणून टाकाऊ होणाऱ्या अथवा अडगळीत पडणाऱ्या असंख्य वस्तू उपयोगात येऊन अकारण वाढणारा कचरा कमी होण्यास मदत व जनतेला छोट्या छोट्या वस्तुंच्या सुट्या भागांची उपलब्धता न झाल्याने टाकाऊ ठरणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू अधिक काळ वापरता येऊन पैशाची बचतही होणार आहे व त्या वस्तू बदलून पुन्हा तीच वस्तू खरेदी करण्याऐवजी दूसरी महत्वाची वस्तू खरेदी करता येणार आहे. असेही दीपक देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.

आम्ही आमच्या बाजूने प्रयत्न करतोच आहे मात्र जनतेच्या सहभागातून व सहकार्याने ही मागणी जर घराघरांतून उठली तर उत्पादक कंपन्यांना असे करण्यात शासनाला बाध्य करावेच लागणार आहे , अशी मागणी कोणताही राजकारणी व्यक्ती करणार नाही मात्र ग्राहक हित लक्षात घेऊन आम्ही या मागणीसाठी सतत पाठपुरावा करणारच आहोत असेही दीपक देशपांडे यांनी स्पष्ट केले

आहे.शक्य झाल्यास ही मागणी पाठपुरावा करण्यासाठी आम्ही प्रांत व केंद्रीय पदाधिकारी यांचे पर्यंत पोहोचून त्यांच्या सहकार्याने हा राष्ट्रीय प्रश्न म्हणून रेटून धरण्याचा ही प्रयत्न करणार आहोत.कारण आमचा उद्देश आहे, ग्राहक हित सर्वोपरी.