अखेर ‘‘तो’’ नरभक्षक वाघ होणार जेरबंद

गडचिरोली (प्रतिनिधी) : देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर जंगल परिसरात मागील २० दिवसांच्या कालावधीत दोन नागरिकांचा बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा येथील 9 जणांचे पथक दाखल झाले आहे.

१४ एप्रिल रोजी कुरूड येथील व ३ मे रोजी चोप येथील एका नागरिकाचा शिवराजपूर जंगल परिसरात वाघाने बळी घेतला. विशेष म्हणजे शिवराजपूर जंगलात असलेला वाघ नरभक्षक असल्याची बाब वनविभागाच्या लक्षात आली. त्यामुळे सदर वाघाला पकडण्यासाठी १४ एप्रिलच्या घटनेनंतर देसाईगंज वनविभागाने वन्यजीव विभागाकडे परवानगी मागितली होती. या विभागाने परवानगी दिल्यानंतर 28 एप्रिल रोजी पथक दाखल झाले आहे. यापूर्वी नागझिरा अभयारण्यातील आठ जणांची टीम आली होती. ही टीम आता परत जात आहे. त्यामुळे ताडोबा येथील 9 जणांची टीम बोलाविण्यात आली आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून वाघाचा शोध घेतला जात आहे. मात्र वाघ हुलकावणी देत आहे.

लाखांदूरवरून देसाईगंजात दाखल
नरभक्षक वाघाचे नाव सीटी-१ असे आहे. हा वाघ मूळचा ब्रम्हपुरी तालुक्यातील आहे. तो काही दिवस लाखांदूर तालुक्यात होता. त्यानंतर हा वाघ देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर जंगलात दाखल झाला आहे. हा वाघ नरभक्षक असल्याचे लक्षात आल्यानंतर वनविभागाने सुरूवातीपासूनच या वाघापासून सावध राहण्याचे आवाहन नागरिकांना केले होते.

४० ट्रॅप कॅमेऱ्यांनी शोध
वाघाला शोधून काढण्यासाठी वनविभागाने शिवराजपूर, उसेगाव जंगल परिसरात विविध ठिकाणी ४० ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. तसेच पथक जंगलात फिरून वाघाचा शोध घेत आहे.

शिवराजपूर-उसेगाव मार्गावर रात्री प्रतिबंध
शिवराजपूर-उसेगाव हे चार किमीचे अंतर आहे. यादरम्यान जंगल आहे. याच परिसरात सदर वाघ आढळून येत आहे. रात्रीच्या सुमारास प्रवाशांना धोका होऊ नये, यासाठी या मार्गावरून सायंकाळनंतर दुचाकी, सायकलस्वार व पायदळ व्यक्तीला जाण्यास प्रतिबंध घातला जातो. यासाठी शिवराजपूर व उसेगावच्या दोन्ही बाजूला वनविभागाचा नाका तयार करण्यात आला आहे.

नागरिकांवर हल्ला करणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी वनविभाग प्रयत्न करीत आहे. नागरिकांनीही सावधानता बाळगावी. जंगलात जाऊ नये. स्थानिक नागरिकांमध्ये जागृती केली जात आहे.
– धर्मवीर सालविठ्ठल,
उपवनसंरक्षक, देसाईगंज