चिमुकली आजी सोबत शौचास गेली आणि झाली गायब

नराधमाने चिमुकलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना

यवतमाळ, (प्रतिनिधी) : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाही. राज्यासह संपूर्ण देशात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. केंद्र सरकार आणि देशातील सर्व राज्य सरकार महिला अत्याचाराच्या विरोधात कठोर कायदे लागू करण्याचा प्रयत्न करत असताना वारंवार अशा प्रकारच्या घटना समोर येताना दिसत आहेत. महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातही अशीच एक घटना समोर आली आहे. एका नराधमाने चिमुकलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. संबंधित घटना ही मारेगाव तालुक्यातील पहापळ येथे घडली.

पीडित चिमुकली ही आपल्या आजीसोबत रात्रीच्या वेळेस शौचास गेली होती. मात्र काही वेळाने चिमुकली बेपत्ता झाली. आजीने चिमुकलीची शोधाशोध केली. पण चिमुकली सापडली नाही. अखेर आजी घरी गेली. आजीने घरी जावून कुटुंबियांना मुलगी दिसत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर कुटुंबियांनी चिमुकलीचा शोध सुरु केला. तरीही पीडितेचा शोध लागला नाही.

या दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी पीडित चिमुकली एका काटेरी झुडपात आढळून आली. कुटुंबियांनी पीडितेला काटेरी झुडपातून बाहेर काढलं. पीडितेने कुटुंबियांना आपल्यासोबत घडलेला सर्व प्रसंग सांगितला. त्यानंतर कुटुंबियांनी तातडीने मारेगाव पोलीस ठाणे गाठत तक्रार केली.

पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाईला सुरुवात केली. पीडितेची वैद्यकीय तपासणी केली. या वैद्यकीय तपासणीत पीडितेवर बलात्कार झाल्याची माहिती निष्पन्न झाली. पोलिसांनी तातडीने या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पीडितेने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी गावातील 30 वर्षीय आरोपी मारोती मधुकर भेंडाळे या नराधमाला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार तपास करत आहेत.