भावानी केला बहिणीवर चाकुहल्ला

स्वतःही केलं विषप्राशन: बहिण-भावावर एकाच रूग्णालयात उपचार सुरू

लाखांदुर (प्रतिनिधी) : वास्तू पूजन सोहळ्यासाठी माहेरी आलेल्या बहिणीसोबत मुलाच्या लग्नावरून झालेल्या वादात भावाने बहिणीवर चाकू हल्ला करून गंभीर जखमी करत स्वतः भावानेही विष पिल्याची घटना तालुक्यातील मांढळ येथे घडली आहे. दरम्यान दोघा बहीण-भावावर भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मैना दादाजी चंडीमेश्राम वय ६० (रा. जुनोना, ता. पवनी) असे जखमी बहिणीचे नाव असून गोविंदा अर्जुन कांबळे वय ५५ वर्ष (रा. मांढळ) असं विष पिणाऱ्या भावाचे नाव आहे. जखमी बहीण मैना चंडीमेश्राम यांच्या मुलांच्या तक्रारीवरुन लाखांदूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गोविंदाचा मुलगा महेश हा १४ वर्षांपासून आत्या मैनाकडे राहत असून मैनाने भाचा महेशचे लग्न करून त्याला घरही बांधून दिले. मात्र, हे सर्व करतांना बहिणीने आपल्याला विश्वासात घेतले नाही, याचा राग भाऊ गोविंदाच्या मनात होता. घराच्या वास्तू पूजन कार्यक्रमासाठी मैना मांढळ येथे आली असता त्यावेळी गोविंदा आणि त्याच्या पत्नीने जुने वाद उकरून काढले. यावेळी बहिणीने हटकले असता, भावाने चक्का बहिणीच्या पाठीवर चाकूने वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी भंडारा सामान्य रुग्णालयत दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आता आपल्यावर कारवाई होईल या भीतीने भाऊ गोविंदानेही विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. विष घेतल्याचे माहीत होताच कुटुंबीयांनी गोविंदाला तत्काळ लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला भंडारा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता दोन्ही भावा- बहीणींवर एकाच रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेचा पुढील तपास लाखांदूर पोलीस करत आहेत.