आनंदवनातील दिव्यांगांचे सुयश

वरोरा (प्रतिनिधी) : दिव्यांगांचे सक्षमीकरण करताना व्यावसायिक प्रशिक्षणा सोबतच त्यांचा औपचारिक शिक्षण प्रवाह देखील मुख्य प्रवाहात अखंडित पणे सुरु रहावा, या हेतूने मागील ५ दशकांपासून महारोगी सेवा समिती, वरोरा संचालित निजबल अंतर्गत संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळा, आनंदवन कार्यरत आहे. अंध, कर्णबधिर व अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना  बोर्डाच्या खाजगी परीक्षा योजने अंतर्गत (१७ नंबर फॉर्म द्वारे) मागील ५ वर्षांपासून एच. एस. सी.चे शिक्षण येथे विनामुल्य दिले जाते.

यावर्षी १७ कर्णबधिर आणि २ अंध असे एकूण १९ दिव्यांग विद्यार्थ्यांनी १२ वी च्या परीक्षेत उत्तम यश संपादित करीत १००% निकाल आणलेला आहे. अभय काळे या अंध विद्यार्थ्याने ६७.३३% तर स्नेहा झाडे या कर्णबधिर विद्यार्थिनीने ६२.६७% गुण मिळवीत शाळेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकविले आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत पालकांचे पूर्ण संमतीने परीक्षा पूर्व तयारी करिता मार्गदर्शन वर्ग घेण्याचे आनंदवनाने ठरविले. कोरोना नियमांचे पालन करीत, लसीकरण करून, वसतिगृहात राहून या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण मेहनतीने अभ्यास करून परीक्षा दिल्या.केवळ २ महिने कालावधीत कर्मशाळा अधीक्षक रवींद्र नलगिंटवार यांचे मार्गदर्शनात राबविलेल्या या उपक्रमात उपप्राचार्य राधा सवाने , समन्वयक प्रवीण ताठे, इक्राम पटेल, अश्विनी आंधळकर, रमेश बोपचे, गणेश जायनाकर, आशिष थेटे, प्रीती पोहाने, नितीन आवारी यांचे सह अनेकांनी सहकार्य केले .सदर यशाकरीता संस्थेचे सचिव डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, संस्था कार्यवाह कौस्तूभ आमटे, सौ. पल्लवी आमटे, डॉ. विजय पोळ, सुधाकर कडू,सदाशिव ताजने,माधव कवीश्वर यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक वाटचाली करिता दिल्या आहेत…!