बल्लारपूर नगरपालिकेत १७ जागा महिलासाठी राखीव

१७ प्रभागातील ३४ जागेसाठी आरक्षण सोडत
अनुसूचित जातीसाठी १० जागा आरक्षित

विसापूर (प्रतिनिधी) : बल्लारपूर नगरपालिका चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात मोठी असून आगामी नगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. येथील नगरपालिकेत एकूण १७ प्रभाग असून ३४ जागेसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये सर्वसाधारण महिला ११, अनुसूचित जाती महिला ५ तर अनुसूचित जमाती महिला १ अशा एकूण १७ जागा महिलासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

बल्लारपूर नगरपालिकेत मतदार संख्या लाखावर आहे. या नगरपालिकेला ब दर्जा प्राप्त असून आगामी निवडणुकीसाठी १७ प्रभागातून प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून दिले जाणार आहे. एकूण ३४ नगरसेवकांपैकी २२ जागा सर्वसाधारण वर्गासाठी असून ११ जागेवर महिलांना प्रतिनिधित्व मिळणार आहे. अनुसूचित जाती ( एस. सी.) साठी एकूण १० जागा राखीव करण्यात आल्या असून ५ जागा महिलांना आरक्षित ठेवण्यात आल्या आहे.अनुसूचित जमाती ( एस. टी.) साठी केवळ दोन जागा असून एक महिला राखीव आहे.

प्रभाग १ – (अ ) सर्वसाधारण महिला, (ब )सर्वसाधारण, प्रभाग २- (अ ) अनुसूचित जाती, (ब ) सर्वसाधारण महिला, प्रभाग ३- (अ ) अनुसूचित जाती महिला, ( ब ) सर्वसाधारण, प्रभाग ४- (अ ) सर्वसाधारण महिला, (ब ) सर्वसाधारण, प्रभाग ५-(अ )सर्वसाधारण महिला, (ब ) सर्वसाधारण,प्रभाग ६- (अ ) अनुसूचित जाती, (ब ) सर्वसाधारण महिला, प्रभाग ७- (अ ) अनुसूचित जाती महिला, (ब ) सर्वसाधारण, प्रभाग ८-( अ )अनुसूचित जाती महिला, (ब )सर्वसाधारण, प्रभाग ९-(अ )सर्वसाधारण महिला, ( ब ) सर्वसाधारण, प्रभाग १०-(अ )अनुसूचित जाती महिला, (ब ) सर्वसाधारण, प्रभाग ११-( अ ) अनुसूचित जाती महिला, (ब ) सर्वसाधारण, प्रभाग १२-( अ ) अनुसूचित जमाती, (ब ) सर्वसाधारण महिला, प्रभाग १३-( अ ) अनुसूचित जमाती महिला, (ब ) सर्वसाधारण महिला, प्रभाग १४-(अ ) अनुसूचित जाती, (ब ) सर्वसाधारण महिला, प्रभाग १५-(अ ) सर्वसाधारण महिला, ( ब ) सर्वसाधारण, प्रभाग १६-( अ ) अनुसूचित जाती, (ब ) सर्वसाधारण महिला, प्रभाग १७-( अ ) अनुसूचित जाती, (ब )सर्वसाधारण महिला, असे एकूण १७ प्रभागातील ३४ जागेचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

आगामी बल्लारपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उपविभागीय अधिकारी दिप्ती सूर्यवंशी (पाटील ), तहसीलदार संजय राईचंवार, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक व नागरिकांच्या उपस्थित नगरसेवक पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले.

गोंडराजांचे शहराला आरक्षणाचा लाभ नाममात्र
बल्लारपूर शहराला गोंड राजांचा वारसा लाभला आहे.१४ व्या शतकात हे शहर गोंड राजांची राजधानी होते. शहराला गोंड राजांच्या नावावरून बल्लारशाह अर्थात बल्लारपूर हे नाव मिळाले. एकेकाळी गोंड राजाची राजधानी असलेले शहरात आजघडीला त्यांची लोकसंख्या अल्प झाली आहे. या पूर्वी नगरपालिका निवडणुकीत अनुसूचित जमातीच्या तीन जागा होत्या. आता मात्र दोनच जागा अनुसूचित जमाती साठी राखीव ठेवण्यात आल्या आहे. यामुळे गोंड राजाच्या राजधानी असलेल्या शहराला नाममात्र आरक्षण असल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.