आई-वडीलांच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्यार्थ्यांना प्रदान करणार सुवर्णपदक

डॉ. रविंद्र होळी यांनी केला कुलगुरूंकडे धनादेश सुपुर्द

मूल (प्रतिनिधी) : आर्थिक अडचणीमुळे शिक्षण घेता न आलेल्या वडीलांच्या व आईच्या नावाने विज्ञान आणि मानवतावादी विषयातील पदवीपुर्व विद्यार्थ्यांसाठी सुवर्णपदक प्रदान करण्यासाठी मूलचे तहसीलदार डॉ. रविंद्र होळी यांनी गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या कुलगुरूंकडे धनादेश सुपुर्द केलेला आहे.

शैक्षणिक सत्र 2021-22 पासुन बिएससी विज्ञान विषयात अनुसुचित जमाती प्रवर्गातील गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थींनीला स्व. मंजुळाबाई साधुजी होळी यांच्या नावाने सुवर्ण पदकासाठी 1 लाख 50 हजार रूपये, तर स्व. साधुजी पाटील होळी यांच्या नावानी बिएससी विज्ञान आणि मानवतावादी विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थी/विद्यार्थींना सुवर्ण पदक देण्यासाठी 1 लाख 50 हजार रूपयांचा धनादेश वित्त व लेखा अधिकारी, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचे नावाने सुपुर्द केलेला आहे.

स्व. साधुजी पाटील होळी यांचे इयत्ता चौथी पर्यंत शिक्षण झाले, मात्र आर्थीक अडचणीमुळे पुढील शिक्षण त्यांना घेता आले नाही, परंतु कुटुंबातील प्रत्येकांनाच त्यांनी उच्च शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. शिक्षणात हुशार असलेल्या समाजातील विद्यार्थ्यांवर आर्थीक परिस्थितीमुळे शिक्षणात खंड नये यासाठी सन 2021-22 पासुन स्व. साधुजी पाटील होळी आणि स्व. मंजुळाबाई साधुजी होळी यांचे नावाने सुवर्णपदक विद्यार्थ्यांना प्रदान करण्यासाठी मूलचे तहसीलदार डॉ. रविंद्र होळी यांनी गडचिरोलीचे आमदार व काका डॉ. देवराव होळी यांच्या उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू बोकारे यांच्याकडे 3 लाखाचे धनादेश सुपुर्द केले.