मूल शहराला पावसाने धो धो धुतले

अनेक नाली, रस्ते पाण्याने तुडुंब भरले : नगर पालीका आणि बांधकाम विभागाचे पितळ उघडे

मूल (प्रतिनिधी) : राज्याचे माजी अर्थमंत्री तथा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातुन मूल शहराच्या विकासासाठी करोडो रूपयाचा निधी खेचुन आणले, मात्र काम करणाऱ्या यंत्रणेने रस्ता व नालीचे काम नियोजनबध्द न केल्याने यावर्षी आलेल्या पहिल्याच पावसाने अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने बांधकाम विभागाचे पितळ उघड पडले असुन अनेकांचे मोठया प्रमाणत नुकसान झालेले आहे.

करोडो रूपये खर्च करून चंद्रपूर-नागपुर या रस्त्याचे काम दोन वर्षापुर्वी करण्यात आले, यासोबतच काही ठिकाणी नाल्याचेही काम करण्यात आले परंतु काही ठिकाणी अजुनही पाहिजे त्या प्रमाणात नालीचे काम करण्यात आलेले नाही यामुळे दरवर्षीच मुख्य रस्त्यासोबच अंतर्गत रस्त्यावरील काही नागरीकांच्या घरात पाणी शिरत आहे-

माहे डिसेंबर 2021 पासुन मूल नगर पालीकेच्या पदाधिकारी आणि सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आलेला असुन सध्यास्थितीत प्रशासक आणि प्रभारी मुख्याधिकाऱ्याच्या भरोश्यावर मूल नगर पालीकेचा कारभार सुरू आहे. दरवर्षी पावसाळा सुरू व्हायच्या आधी नगर पालीकेमार्फत नाली सफाईचे काम केल्या जात होते यावर्षी नगर पालीकेचे याबाबत नियोजन नसल्याचे अनेकांच्या घरात पाणी शिरून नागरीकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेले आहे.

अतिकमणाकडे दुर्लक्ष केल्याने नागरीकांच्या घरात पाणी : विजय सिध्दावार
चुकीचेे रस्ते आणि नाली बांधकाम, पावसाळयापुर्वी नालीसफाई न करणे आणि पाण्याच्या नैसर्गिक स्त्रो़त्रावर होणाऱ्या अतिक्रमनाकडे दुर्लक्ष केल्याचा फटका मूल वासीयांना बसला आहे, एकाच पावसात घरात पाणी शिरण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत असल्याची प्रतिक्रिया आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय सिध्दावार यांनी दिली.

नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्याना दिले निर्देश : आ. सुधीर मुनगंटीवार

मुल शहरात झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे नागरिकांच्‍या घरात पाणी शिरून मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर काही घरांची पडझड देखील झाली आहे. या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्‍यात यावे व नागरिकांना नुकसान भरपाई देण्‍याच्‍या दृष्‍टीने कार्यवाही करावी असे निर्देश माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यांना दिले.

गेली दोन दिवस मुल शहरात झालेल्‍या संततधार पावसामुळे व अतिवृष्‍टीमुळे सुमारे ३०० घरांमध्‍ये पाणी शिरून नागरिकांन सामान वाहून गेले व काही घरांची पडझड देखील झाली आहे. नागरिकांना घर सोडून अन्‍यत्र निवारा शोधावा लागला आहे. या घटनेची तातडीने दखल घेत नागरिकांच्‍या झालेल्‍या नुकसानाचे तातडीने पंचनामे करावे आणि नागरिकांना नुकसान भरपाई देण्‍याची कार्यवाही त्‍वरेने करावी, असे निर्देश जिल्‍हाधिकाऱ्यासह उपविभागीय अधिकारी मुल, तहसीलदार मुल आदींना आ. मुनगंटीवार यांनी दिले.