पिकअप उलटून 43 शेतमजुर जखमी

जखमीवर उपचार सुरु : जीवितहानी नाही 

चिमूर (प्रतिनिधी) : सततधार पावसामुळे शेतीच्या कामाला गती आली असून शेतावर मजूर घेऊन जाणारा पिकअप उलटल्याने जवळपास 43 मजूर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील गोंदेडा-खांबाळा मार्गांवर घडली.  जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.

जिल्ह्यात सध्या जोरदार पावसाने हजेरी लावली असून यामुळे शेतीच्या कामांना गती आली आहे. परंतु, शेतीकामात मजूरांची कमतरता भासत असल्याने पिकअप, ऑटोने त्यांना शेतात आणले जात आहे. चिमूर तालुक्यातील येरखडा येथील पिकअप वाहनाने केवाडा गावातील शेतमजुर गोंदेडा-खांबाडा मार्गावरील मनोज नत्थुजी वाघे यांच्या शेताकडे घेऊन जात असातांना पिकअप वाहन चालकाचे नियंत्रण सुटले व रस्त्याकडेला वाहन उलटले. या वाहनात 43 मजूर होते

अपघात होताच आसपासचे शेतकरी, शेतमजूर धावून गेले. व वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. जखमींना उपचाराकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे हलविण्यात आले आहे. या अपघातात 19 शेतमजूर गंभीर जखमी झाले आहेत. तर 24 शेतमजूर किरकोड जखमी झाले आहेत.