पुरामुळे ७ हजार ८८६ हेक्टर पैकी ८० टक्के पाण्याखाली

शेतकरी दुबार पेरणीच्या संकटामुळे हवालदिल

बल्लारपूर तालुक्यात ६८ टक्के पर्जन्यमान

विसापूर (प्रतिनिधी) : बल्लारपूर तालुक्यातील कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान सरासरी ११८५.६ मी. मि. एका हंगामात पाऊस पडतो. या पावसावर शेतकऱ्यांचा खरीप व रब्बी हंगाम अवलंबून आहे. तालुक्यात ७ हजार ८८६ हेक्टर इतके खरीप हंगामाचे कृषी क्षेत्र आहे. यातील ८० टक्क्यावर कृषी क्षेत्र यावर्षी वर्धा नदीच्या पुरामुळे बाधित झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आल्याने तो हवालदिल झाला आहे.आजतागायत बल्लारपूर तालुक्यात ६८.२ टक्के पर्जन्यमान झाले असून मागील वर्षीच्या तुलनेत ३१.१ टक्के इतका अधिक आहे.

बल्लारपूर तालुक्यात खरीप हंगामाचे एकूण कृषी क्षेत्र ७ हजार ८८६ हेक्टर आर इतके आहे.शेतकऱ्यांनी जीवापाड मेहनतीने कापूस, सोयाबीन, भात, मूग, भाजीपाला व अन्य कडधान्याची लागवड केली. शेतकऱ्यांचा मुख्य हंगाम खरीपाचाच आहे. मात्र मागील सहा दिवसापासून निसर्ग शेतकऱ्यांवर कोपला.तब्बल १० वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वर्धा नदी शेतकऱ्यांवर कोपली. वर्धा नदीच्या प्रकोपाने शेतकरी घायाळ झाला. पुरामुळे बळीराजाचा खरीप हंगाम हिरवला.८० टक्के खरीपाचे कृषी क्षेत्र पुराच्या पाण्याखाली तीन दिवस राहिल्याने उभ्या पिकांची नासाडी झाली आहे.

ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्था कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना देखील एका वर्षाच्या कृषी हंगमावर वर्षभराची उदरनिर्वाहासाठी तजवीज करावी लागते. यासाठी बळीराजा बी -बियाणे, शेतीची मशागत, खते, मजुरी आदींचे नियोजन करून उत्पन्न वाढीसाठी जीव तोडून शेतात राबतो. मात्र निसर्ग शेतकऱ्यांवर नेहमी कोपतो. कधी पूर, कधी निसर्गाचा दगा तर कधी मानव निर्मित समस्या शेतकऱ्यांची दैना करते. यातून शेतकऱ्यांना सावरण्याची संधीच मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे अवसान गळते. या वर्षी पर्जन्यमान बरे होईल म्हणून हवामान विभागाने अवगत केले. यामुळे शेतकरी आनंदात होता. मात्र बल्लारपूर तालुक्यात निसर्ग चांगलाच बरसाला. सलग सहा दिवसाच्या पावसाने वर्धा नदीला पूर आला. यात तालुक्यातील शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. सलग तीन दिवस शेतातील पिके पुराच्या पाण्यात राहिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

बल्लारपूर तालुक्यात मागील वर्षी १५ जुलै पर्यंत ४४० मि. मी. इतका पाऊस पडला होता. त्याची टक्केवारी ३७.१ इतकी होती. मात्र यावर्षी याच तारखेत ६८२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण ५७.५ इतके आहे. अजून अडीच महिने पावसाचे आहे. मागील वर्षी बल्लारपूर तालुक्यात जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान १४३६ मि. मी. पावसाची नोंद असून सरासरीच्या तुलनेत अधिक होती.शासनाने खरीप हंगामाचे पंचनामे करून तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे.