जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर परिस्थितीचा आढावा

नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी म्हणून दिले निर्देश

बल्लारपूर (प्रतिनिधी) : बल्लारपूर तालुक्यात अतिवृष्टीने एकाच आठवड्यात दोनदा वर्धा नदीला पूर आला. अतिवृष्टी व पुराने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे बळीराजा हवालदिल झाला.त्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी गुरुवारी बल्लारपूर तालुक्यातील बामणी ( दुधोली )भागाला प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेऊन तहसील प्रशासनाने त्वरित नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

बल्लारपूर तालुक्यात मागील १५ दिवसापासून पाऊस पडत आहे.अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाहून गेला. अशातच आठवड्यात दोनदा वर्धा नदीला आलेल्या पुराने साऱ्यांची दैना केली. एकूण ७ हजार ८८६ हेक्टर पैकी ५ हजारावर हेक्टर खरीप हंगामाचे नुकसान झाले. शेकडो घराची पडझड झाली. बल्लारपूर शहरासह ग्रामीण भागात मोठे नुकसान पुराने व अतिवृष्टीने झाले. याचे तहसील प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी उपविभागीय अधिकारी दिप्ती सूर्यवंशी ( पाटील ) व तहसीलदार संजय राईचंवार यांना दिले.

यावेळी उपविभाग कार्यालयात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा सभा घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी दिप्ती सूर्यवंशी ( पाटील ), तहसीलदार संजय राईंचवार, बल्लारपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजय देवळीकर, तालुका कृषी अधिकारी श्रीधर चौव्हान, मंडळ अधिकारी शंकर खोब्रागडे, तलाठी शंकर खरूले, बांधकाम अभियंता वैभव जोशी, बामणी ( दुधोली ) येथील सरपंच सुभाष ताजने यांची उपस्थिती होती.

दरम्यान जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी बामणी ( दुधोली ) – राजुरा दरम्यान वर्धा नदी पूल, बल्लारपूर शहरातील पूरग्रस्त गणपती वार्ड व बामणी ( दुधोली )परिसरातील नुकसान ग्रस्त शेतीची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

बल्लारपूर तालुक्यात यावर्षी निसर्ग कोपला. अतिवृष्टी व पुराने शेत पिकाचे मोठे नुकसान झाले. बामणी ( दुधोली ) गावासह तालुक्यातील विसापूर, नांदगाव (पोडे ), हडस्ती, चारवट, दहेली, लावारी, कळमना, आंमडी, पळसगाव, येनबोडी, कोठारी, किन्ही, मानोरा, कवडजई, इटोली, काटवली ( बामणी ), कोर्टीमक्ता आदी गावातील शेतकऱ्यांना मोठी झळ बसली आहे. शेकडो घरांची पडझड झाली आहे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना तातडीने शासनाने मदत करावी. तालुक्यातील शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. नुकसान ग्रस्ताना वेळीच दिलासा द्या.
सुभाष ताजने, सरपंच बामणी (दुधोली)