”त्या” महिलेच्या जीवासाठी धडपड करणाऱ्यांचा सत्कार

शौर्य पुरस्कार मिळावा म्हणून आग्रह : हडस्ती येथील त्या भावावर कौतुकाचा वर्षाव

अनेकेश्वर मेश्राम, बल्लारपूर
बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती व चारवट गावाला दुसऱ्यांदा आलेल्या वर्धा व इरई नदीच्या पुराने वेढा दिला. पुराने चारही दिशेला वेढा होता. परिणामी गावाचा सपंर्क तुटला. मंगळवारी रात्री हडस्ती येथील एक महिला गंभीर आजारी असल्याचे माहित झाले. तिला दवाखान्यात उपचारासाठी नेण्यासाठी कुटुंबाची धडपड सुरु झाली. मात्र मध्यरात्री कशी उपाययोजना करावी, म्हणून सारेच विवंचनेत आले. यावेळी धाडस एकवटून रात्रीच्या किर्रर्र काळोखात संबा मेश्राम व मधुकर मेश्राम यांनी नाव ( डोंगा )घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व बचाव पथका पर्यंत आणून सोडले. यामुळे हडस्ती येथील ‘ त्या ‘ महिलेला वेळीच उपचार मिळून तिचा जीव वाचला. या अतुलनीय कामगिरीबद्दल गावाकऱ्यांनी त्यांचा नागरी सत्कार करून कौतुकाचा वर्षाव केला.

बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती येथील शिला रतन रॉय ( ३२) असे भीषण पुरातून मार्गक्रमन करून वेळीच उपचाराने जीव वाचलेल्या महिलेचे नाव आहे. शिला रॉय या आजाराने फणफणत होत्या. मंगळवारच्या रात्री आजारपणात तिला ह्रदयविकाराचा झटका आला. यामुळे कुटुंबीय चांगलेच धस्तावले. तिचा जीव वाचावा म्हणून धडपड सुरु झाली. मात्र मार्ग सापडत नव्हता. गावातील पूर संकट म्हणून उभा ठाकला होता. रात्रीचा किर्रर्र अंधारातून दवाखान्यात तिला उपचारासाठी कसे न्यावे. हा प्रश्न होता. ही माहिती गावाकऱ्यांनी बल्लारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार यांना दिली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व बचाव पथकासोबत वेळीच सपंर्क केला.

बोट चालक राजू निंबाळकर व व्यवस्थापक जितेंद्र सुरवाडे नांदगाव ( पोडे ) गावात आले. मात्र पुरातून कोणत्या दिशेने बोट न्यावी. ही अडचण बोट चालकाला सतावत होती. यावेळी हडस्ती येथील संबा मेश्राम व मधुकर मेश्राम या भावंडानी रात्रीच्या किर्रर्र काळोखात डोंग्याच्या साहाय्याने वाठाड्याची भूमिका पार पाडून शिला रॉय या महिलेला चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वेळीच उपचारासाठी नेण्यासाठी सहकार्य केले. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष सूर्या आडबले व देवानंद शेंडे, ग्रामसेवक निशा बोरकर यांनी मधुकर मेश्राम व संबा मेश्राम या भावंडाचा भावपूर्ण सत्कार केला. यावेळी शालिक देरकर, मंगेश ढोबे, प्रशांत ढोबे, पंढरी खोके, श्यामराव गौरकार, रामचंद्र पिंपळशेंडे, रवींद्र ढोबे, बालाजी पिंपळशेंडे, छत्रपती जुनघरे, यादव पिंपळशेंडे यांच्यासह गावाकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी गावाकऱ्यांनी शासनाकडे त्या भावंडाच्या गौरवास्पद कामगिरीबद्दल शौर्य पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्याची आग्रही मागणी केली.