तिसऱ्यांदा आलेल्या पुराने सपंर्क तुटला : इरई धरणातील पाण्याचा विसर्ग कारणीभूत
अनेकेश्वर मेश्राम, बल्लारपूर
बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती व चारवट गावाला १५ दिवसात तिसऱ्यांदा पुराने वेढा दिला आहे. वर्धा व इरई नदीच्या पुराने रविवारी सायंकाळी ५ वाजता धोक्याची पातळी पार केली. परिणामी हडस्ती व चारवटचा सपंर्क तुटला आहे. याला कारणीभूत इरई धरणातील पाण्याचा विसर्ग आहे. हडस्ती व चारवट येथील नागरिकांची सततच्या पुराने दैना केली आहे.
वर्धा नदी पात्रात २२ ते २४ जुलै दरम्यान लोअर वर्धा, अप्पर वर्धा व इरई धरणातून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे वर्धा नदीची पाण्याची पातळी वाढली असून बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती व चारवट गावाला तिसऱ्यांदा पुराने वेढले आहे. चारवट – हडस्ती व माना – चारवट मार्ग रविवारी सायंकाळी ५ वाजता इरई नदीच्या पुलावर ६ फूट पर्यंत पाणी आल्याने बंद झाला आहे. बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती व चारवट येथील नागरिक वारंवार येणाऱ्या पुराने वैतागले आहे.दोन दिवसापासून पावसाची रिपरिप सुरु असून वर्धा व इरई नदीच्या पुराने साऱ्यांची दैना केली आहे.
१५ दिवसाच्या कालावधीत तिसऱ्यांदा पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे बळीराजा घायाळ झाला आहे. रोज मरे, त्याला कोण रडे, अशी अवस्था सतत येणाऱ्या पुराने केली आहे. शेतकऱ्यांना पुराने हवालदिल करून सोडले आहे. अशातच पुरामुळे हडस्ती व चारवट गावाला वीज वहन करणारे खांब पुराच्या पाण्याखाली येत असल्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात आहे. या गावातील नागरिकांना दिवसरात्र काळोखात काढावी लागत आहे. परिणामी पुरामुळे गावाकऱ्यांची चांगलीच दैना केली आहे.
बल्लारपूर – राजुरा पूल पाण्याखाली येण्याची शक्यता
अप्पर वर्धा, लोअर वर्धा व इरई धरणातील पाण्याचा विसर्ग वर्धा नदीच्या पात्रात केला जात आहे. यामुळे वर्धा नदी धोक्याची पातळी गाठत आहे. आजघडीला वर्धा नदीच्या पाण्याची पातळी १६९.३२ मीटर इतकी आहे. यात वाढ होऊन ती पाण्याची पातळी १७४ मीटर पर्यंत वाढली तर बामणी ( दुधोली ) जवळील बल्लारपूर – राजुरा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याची शक्यता आहे. वर्धा नदी पात्रात धरणातील पाणी साठा सोडला जात असल्याने वर्धा व इरई नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी.
संजय राईंचवार तहसीलदार बल्लारपूर.