अवैध दारूविक्री विरोधात महिलांचा एल्गार

चिंतलधाबा येथील महिला धडकल्या पोलिस ठाण्यात : गावात हवालदार व शिपाई नेमण्याची मागणी

दिलीप मॅकलवार, पोंभुर्णा
पोंभूर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथे अवैध दारू विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. दारूच्या व्यसनामुळे कुटुंबात कलह निर्माण होऊन अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. चिंतलधाबा गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी शेकडो महिलांनी पोंभूर्णा पोलिस ठाण्यात पोहोचून तक्रार देत अवैध दारू व्यावसायीकावर कडक कार्यवाहीची मागणी केली.

चिंतलधाबा ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत असून चिंतलधाबा व खरमत गावात अवैध दारू व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. चिंतलधाबा व्यवसायाच्या दृष्टीने मोठी बाजारपेठ असून आजूबाजूच्या खेड्या पाड्यातील लोकं खरेदी विक्रीसाठी येतात. याची संधी साधून गावातील काही अवैध दारू व्यावसायीक देशी, विदेशी व मोहफुलाची दारू आणून गावात विक्री करीत आहेत. यामुळे गावातील वातावरण कलुषित होत असून महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याच्या मागणीला घेऊन चिंतलधाबा येथील महिलांनी दारूसंदर्भात गावात सभा घेऊन अवैध दारूविक्री कायमची बंद झाली पाहिजे याबाबतचे निवेदन पोंभूर्णा येथील पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.

यावेळी सरपंच शुभांगी कुत्तरमारे, माजी सरपंच मंगला कुळमेथे, ग्रामपंचायत सदस्य माया कडते, निवृत्ता कुळमेथे, रेखा बावणे, अंतकला मडावी यांसह शेकडोे महिला उपस्थित होते.