रक्तदान केल्यामुळे सामाजिक ऋण फेडण्याची भावना जागृत होते – उमेश पाटील

जागतिक छायाचित्र दिनानिमित्य रक्तदान शिबीर

बल्लारपूर (प्रतिनिधी) : आपल्या समाजात रक्तदानाला अन्यय साधारण महत्व आहे. मानवी जीवनात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कोणाचा तरी जीव वाचतो. याचे समाधान मिळते. सामाजिक ऋण फेडण्याची संधी मिळते. या संधीचे मूल्य मोठे असते. म्हणून जीवनात एकदा तरी प्रत्येकांनी रक्तदान करावे, असे प्रतिपादन बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी केले. बल्लारपूर तालुका फोटोग्राफर्स संघटनेच्या वतीने जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून इंडियन मेडिकल असोसिएशन सभागृहात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ठाणेदार उमेश पाटील बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ छायाचित्रकार सत्यनारायण रेड्डी होते, तर उदघाटक म्हणून पोलीस निरीक्षक उमेश पाटील, फोटोग्राफर्स असोसिएशन अध्यक्ष संजय वानखेडे, आनंद गोंगले, राहुल कडुकर, अशोक नाईक, कार्तिक गोरडवार, किशोर सातपुते, मिलिंद दारून्डे, प्रवीण साठे, गौतम रामटेके, निलेश घुमे आदी उपस्थित होते.

दरम्यान रक्तदान शिबिरात तब्बल ४१ वेळा रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासणारे संजय वानखेडे यांचा देखील सत्कार करण्यात आला. त्यांनी प्रास्ताविक भाषणातून ग्रामीण व शहरी भागातील फोटो ग्राफर्स च्या समस्या मांडल्या. यावेळी पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन विवेक गडकर यांनी केले, तर आभार संजय बोरकर यांनी मानले. यावेळी फोटोग्राफर्स असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.