अखेर ” तो ‘ बिबट जेरबंद

विभागाच्या रेस्क्यू पथकाला यश :  गावकऱ्यांनी घेतला सुटकेचा निःश्वास

बल्लारपूर (प्रतिनिधी) : :मध्य चांदा वन विभागातील बल्लारशाह वन परिक्षेत्रातील विसापूर गावाच्या हद्दीतील जुन्या औष्णिक वीज केंद्राच्या पडक्या वसाहतीत मागील दोन महिन्यापासून बिबट्याचा वावर होता. सोमवारी सायंकाळी बिबट्याने विसापूर गावातील वार्ड पाच मध्ये धुमाकूळ घातला. प्रल्हाद मशाखेत्री यांची बकरी ठार केली. यामुळे नागरिकात मोठी दहशत निर्माण झाली. बल्लारपूर वन विभागाने याची दखल घेऊन मंगळवारी दोन व बुधवारी दोन असे चार पिंजरे लावले. अखेर रेस्क्यू पथकाला यश येऊन बुधवारी सायंकाळी ८.३० वाजता बिबट्याला जेरबंद करण्यात आले. यामुळे गावाकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास घेतला.

बल्लारपूर वन परिक्षेत्रातील जुन्या औष्णिक वीज केंद्राची पडकी वसाहत आहे. या ओसाड वसाहतीत झुडपे वाढली आहे. परिणामी वन्य प्राण्यांनी ओसाड वसाहतीचा आसरा घेतला. काही दिवसा अगोदर दिवसा देखील बिबट्याचे दर्शन नागरिकांना झाले होते. यामुळे जिवहाणी होण्याची शक्यता बळावली होती.नागरिकात भीतीचे वातावरण पसरले होते. गावाकऱ्यांनी बिबट जेरबंद करण्याची मागणी वन विभागाकडे केली होती.
याची दखल घेऊन मध्य चांदा वन विभाग चंद्रपूर च्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांनी शासनाकडे बिबट जेरबंद करण्याची मंगळवारी परवानगी मागितली. शासनाकडून परवानगी मिळताच त्यांनी सभा घेऊन बिबट जेरबंद करण्याचे निर्देश बल्लारपूर वन परिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांना दिले.

बिबटयाला जेरबंद करण्यासाठी मध्य चांदा वन विभागातील बल्लारशाह वन विभागाची रेस्क्यू पथक सक्रिय झाले. यासाठी वन विभागाने बिबट्याची हालचाल टिपण्यासाठी चार ठिकाणी ट्रप कॅमेरे व चार ठिकाणी पिंजरे लावले होते. अखेर बुधवारी सायंकाळी ८.३० वाजता पिंजऱ्यात बिबट जेरबंद झाला.

ही कारवाई चंद्रपूर मध्य चांदा वन विभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांच्या मार्गदर्शनात व विभागीय वन अधिकारी सुहास बढेकर यांच्या नेतृत्वात मानद वन्य जीव रक्षक बंडू धोत्रे, सहायक वन संरक्षक श्रीकांत पवार, व्याघ्र वन्य जीव रक्षक मुकेश भांधककर, बल्लारशाह वन परिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे, पशुधन विकास अधिकारी डाँ. दिलीप जांभुळे यांच्या मार्फत करण्यात आली.