गणेशोत्सव साजरा करताना देशभक्तीचे दर्शन घडावे : पोलीस अधीक्षक अरविंद साळवे

बल्लारपुरात पार पडली शांतता समितीची सभा

बल्लारपूर (प्रतिनिधी) : आपण आजघडीला स्वातंत्रच्या अमृत महोत्सवी वर्षात आहोत. आगामी काळात गणेशोत्सव साजरा करणार आहोत. आपली संस्कृती उत्सव प्रिय आहे. उत्सव साजरे करताना सामाजिक बांधिलकीचे भान ठेवणे आवश्यक आहे. कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार नाही. याची आपण दक्षता घ्यावी. गणेशोत्सव दरम्यान देशभक्तीचे देखावे तयार करून ही भावना नागरिकांच्या मनात रुजवावी, असे असी साद चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी गणेशभक्तांना घातली.

बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या वतीने गुरुवारी स्थानिक पोलीस ठाण्यात गणेश मंडळ, डी. जे. साउंड, बँड पथक, मूर्तिकार, पोलीस पाटील यांची शांतता समितीची सभा गणेशोत्सव सणा निमित्ताने पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानावरून पोलीस अधीक्षक अरविंद साळवे बोलत होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी दिप्ती सूर्यवंशी ( पाटील ), उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, तहसीलदार डाँ. कांचन जगताप, नगरपालिका उपमुख्याधिकारी जयंत कातकर, बल्लारपूरचे ठाणेदार उमेश पाटील, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, घनश्याम मुलचंदानी, माजी न. प. गट नेते देवेंद्र आर्य, निलेश खरबडे, बामणीचे सरपंच सुभाष ताजने, विसापूरचे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी दिप्ती सूर्यवंशी ( पाटील ) म्हणाला, मागील दोन वर्षांपासून कोरोना संक्रमण काळामुळे सण व उत्सवावर निर्बंध होते. मात्र आजघडीला ती परिस्थिती नाही. आपली परंपरा जोपसत असताना कायदा व सुव्यवस्था पाळणे, तेवढेच महत्वाचे आहे. गणेशोत्सव साजरा करताना प्रशासन आपल्या सोबत आहे. आवश्यक बाबीची पूर्तता करून व परवानगीने गणेशोत्सव साजरा करा, असे दिप्ती सूर्यवंशी ( पाटील ) यांनी सांगितले. यावेळी हरीश शर्मा, घनश्याम मुलचंदानी यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक ठाणेदार उमेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन नृसिंह नागरी संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार यांनी तर आभार पोलीस उपनिरीक्षक चेतन टेंभुर्ने यांनी मानले. यावेळी बल्लारपूर पोलीस ठाण्याअंतर्गत गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, डी. जे. साउंडचे मालक, बँड पथकवाले, पोलीस पाटील यांची उपस्थिती होती.