पोळ्याला सुट्टी द्या, ‘बळीराजा दिन’ घोषित करा

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

चंद्रपूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या कष्टाबाबत आपण नेहमीच चर्चा करतो. आणि ती व्हायला हवी. मात्र, शेतकऱ्यासोबत आणखीण एक जण आहे. जो शेतात खूप राबतो. तो म्हणजे बैल. आपल्या मालकाला त्याच्या कष्टाचे चीज मिळेस्तोवर तो राबतो. याच कष्टकरी बैलाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा करतो. बळीराजा जो शेतात कष्ट करतो अशा बैलाची देव समजून पूजा करण्याचा दिवस मानला जातो. पोळा या सणाला महाराष्ट्र शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करुन हा दिवस ‘बळीराजा दिन’ म्हणून प्रत्येक वर्षी साजरा करण्यात यावा. लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

पोळ्याच्या दिवशी फक्त बैलांचीच नाही तर शेतीसाठी लागणाऱ्या नांगर, विळी, कोयता, खोर इत्यादी साधनांची देखील पूजन केले जाते. बैलाचे शेतकऱ्यांवरती अनंत उपकार असतात व ते उपकार शेतकरी फेडू शकत नाही. म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण अगदी आत्मियतेने साजरा केला जातो.

महाराष्ट्र राज्य हे प्रामुख्याने शेतक-यांचे राज्य म्हणुन ओळखले जाते. राज्यात शेती हा प्रमुख व्यवसाय असुन महाराष्ट्रात राज्यात सर्वत्र पोळा हा सण शेतकरी मोठया उत्साहात साजरा करीत असतांत. अलिकडेच आपण गोकुळाष्टमी निमित्त दहिहंडीची शासकीय सुट्टी जाहीर केलीत. महाराष्ट्रात उत्साहात साजऱ्या होणाऱ्या पोळा या सणाला महाराष्ट्र शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करुन हा दिवस बळीराजा दिन म्हणून प्रत्येक वर्षी साजरा करण्यात यावा. जेणेकरुन या निमित्ताने अन्नदात्या बळीराजाचा उचित सन्मान होईल.