नवे मीटर मिळेना, विजबिल कमी होईना

ग्रामिण भागातील नागरिक त्रस्त : फॉल्टी मिटर बदलविण्याकडे दुर्लक्ष

कोठारी (प्रतिनिधी): महाराष्ट्रराज्य विज वितरण कंपनीच्या अफलातून आणि अनागोंदी कारभारामुळे ग्रामीण भागातील नागरिक मेटाकुटीला आला आहे. सातत्याने विजबिलाची रक्कम अवाढव्य वाढवून येत आहे. त्यातच दर महिन्याचे विजबिल भरणा करणे अनिवार्य करीत नवा फतवा जारी केल्याने मोलमजुरी करून उपजीविका चालविणाऱ्या नागरीकांचे कंबरडे मोडले आहेत. भरमसाठ बिलामुळे व विद्युत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बळजबरीमुळे त्रयस्त नागरीकात विज वितरण कंपनीच्या विरोधात रोष उफाडला आहे.

आधुनिक युगात घरगुती वापरातील विज ही महत्त्वाची व आवश्यक गरज आहे. विजेवर अलीकडे बरीच उपकरणे चालविली जातात. प्रत्येक बाबींसाठी विजेचा वापर होतो. जर थोळ्या कालावधी साठी विजपुरवठा खंडीत झाला तरी मानवी जीवन प्रभावीत होते. म्हणून अखंडित वीजपुरवठा काळाची गरज ठरली आहे. परंतु ग्रामीण भागातील गरीब, मजुर, शेतकरी व सर्वसामान्य सुज्ञ नागरिक अतिरिक्त विजेचा वापर टाळतात. काम असेल तरच विजेचा वापर करतात. कारण विजकंपनीच्या दर वाढ , अतिरिक्त भार आणि अपेक्षित नसताना अवाढव्य विज बिलाची रक्कम त्यांना प्रभावित करीत असते. वेळेवर मजुरीचा पैसा मिळत नाही. कामाची वाणवा असल्याने महिनाभर प्रपंच चालवने कठीण होत असते. विजबिलाची तारीख संपत नाही, तोच विज कर्मचारी विज खंडित करण्यासाठी दारावर उभाच. विज खंडित झाली की मग जुळवाजुळव करून विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी बिलाच्या रक्कमेसह दंडात्मक रक्कम अतिरिक्त ३०० मोजावे लागतात. या परिस्थितीमुळे विज ग्राहक मेटाकुटीस आला आहे.

कंपनीच्या या कामांना विलंब कां?
विज बिलाची रक्कम ग्राहकांकडून बळजबरीने वसुल केल्या जाते. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली जात असते. मग अन्य कामात कंपनी दिरंगाई का करीत असते. विशेषतः ग्रामिण भागातील अनेक विज ग्राहकांचे मिटर अनेक महिन्यांपासून फॉल्टी आहेत. त्याची तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी नवे विज मिटर बदलवून देण्याची जबाबदारी विज वितरण कंपनीची आहे. यासाठी बरेच अर्ज अनेक महिन्यांपासून कार्यालयात धुडखात पळले आहे. अर्ज करुन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. फॉल्टी मिटर धारकांना अवाच्या-सवा विजबिल वाढवून बळजबरी केल्या जात आहे. अनेक ठिकाणी नवीन घराचे बांधकामे सुरू आहेत. विहित वेळेत नविन विज मिटर न मिळाल्यामुळे अनेक घरमालकांना बांधकाम बंद करने भाग पळले आहे. तर बरेच घर बांधकाम धारक शेजाऱ्यांकडून तात्पुरत्या स्वरूपात विजपुरवठा घेऊन बांधकामासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज भागवित आहेत. मग सदर विज वितरण कंपनी विलंब कां करते हा प्रश्न नागरिकाना भेडसावत आहे.