जिल्हा परिषद शिक्षकाचे अपघाती निधन

विसापूर (प्रतिनिधी) : बल्लारपूर पंचायत समितीच्या पळसगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कार्यरत शिक्षक सुनील पत्रू कोवे यांच्या दुचाकीला बल्लारपूर – कोठारी मार्गा दरम्यान लावारी जवळ अपघात झाला. या अपघातात सुनील कोवे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी शालिनी कोवे गंभीर जखमी झाल्या असून त्यांचेवर चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना शनिवारी सकाळी ७.३० वाजता घडली.

बल्लारपूर येथील सुनील कोवे व त्यांच्या पत्नी शालिनी कोवे दोघेही शिक्षक म्हणून कार्यरत आहे. बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत पळसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत सुनील कोवे तर कळमना जिल्हा परिषद शाळेत शालिनी कार्यरत आहे. शनिवारी सकाळी शाळा असल्याने दोघेही दुचाकीने कर्तव्यावर जात होते. बल्लारपूर – कोठारी मार्गादरम्यान लावारी गावाजवळ त्यांच्या दुचाकीला डुकराची जबरदस्त धडक बसली. त्यामुळे दुचाकी अनियंत्रित झाल्याने सुनील कोवे रस्त्यावर फेकल्या गेले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुःखापत झाल्याने सुनील कोवे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी शालिनी कोवे गंभीर जखमी झाल्या. सुनील कोवे आफ्रोट संघटनेचे बल्लारपूर तालुका अध्यक्ष होते. आदिवासी समाजातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे व सामाजिक बांधिलकी जोपासणारे मनमिळावू व्यक्तीमहत्वाचे धनी सुनील कोवे यांचे अपघाती निधन झाल्याबद्दल अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा प्रमुख व बल्लारपूर तालुका समन्व्यक प्रदीप गेडाम, माजी जिल्हा परिषद सदस्य हरीश गेडाम यांनी दुःखवटा व्यक्त केला.