राजुरा बसस्थानकाचे छतावर झाड कोसळले

एक प्रवाशी किरकोळ जखमी

राजुरा (प्रतिनिधी) : बल्लारपूर येथील रेल्वे पादचारी पुलाच्या अपघाताची घटना ताजी असतानाच झाड पडल्याने राजुरा येथील बस स्थानकाचे सिमेंट पत्र्याचे छतावर झाड कोसळल्याची घटना आज दुपारी घडली. यात मनोज पाझरे हा प्रवाशी किरकोळ जखमी झाला आहे. या छताखाली सकाळी किंवा सायंकाळी बाहेर गावावरून येणाऱ्या व जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. सुदैवाने दुपार असल्याने येथे जास्त विद्यार्थी नव्हते. राजुरा बस आगार व्यवस्थापक पुरुषोत्तम व्यवहारे यांनी दिलेल्या माहितीनुसार आगाराचे चाळीस ते पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे.

राजुरा बस स्थानकाच्या मागील बाजूस वन विभागाची वसाहत आहे. या भागात अनेक झाडे या बस स्थानकाला लागून आहेत. यातील जुने व जीर्ण झालेले एक झाड तोडण्यात येत होते. ते तोडताना झाडाची फांदी बस स्थानकावर कोसळली. या घटनेत मनोज पाझरे वय, 25 हा प्रवाशी जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

याविषयी राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांनी माहिती दिली की, वन वसाहत परिसरात नीलगीरीची जुनी आणि जीर्ण झालेली झाडे आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव ही झाडे तोडण्याची मागणी होती. आज क्रेनच्या साहाय्याने काळजी पूर्वक हे झाड कापण्याचे काम सुरू होते. मात्र हे झाड पाडताना शेजारी दुसऱ्या वाळलेले झाडाची फांदी बस स्थानकाच्या सिमेंट पत्र्यावर पडली आणि तीन- चार पत्रे तुटले आहेत.