खोरीपचे प्रशांत डांगे यांनी केली मागणी
ब्रम्हपुरी (प्रतिनिधी) : चंद्रकांत पाटील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र शासन मुंबई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा उभारल्या अशी वादग्रस्त विधान केले त्याच्या विरोधात कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी खोरीपाचे ब्रम्हपुरी शहराध्यक्ष प्रशांत चरणदास डांगे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 9 डिसेंबर 2022 रोजी समाजसुधारक सामाजिक परिवर्तनाचे अग्रदूत डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्या काळात सरकार शाळांना अनुदान देत नसतानाही या महापुरुषाने लोकांकडे भीक मागून शाळा उभारल्या असे वादग्रस्त विधान केले. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रातील तमाम छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील यांना मानणाऱ्या समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.
एका जबाबदार राज्याच्या लोकप्रतिनिधींकडून महापुरुषांचा अपमान करून, वादग्रस्त विधान करून जातीयतेढ निर्माण करून सामाजिक विषमता पसरवीत आहे. त्यामुळे राज्यात अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था मोडकळीस येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच यापुढे कोणत्याही महापुरुषांचा बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आळा बसावा. यासाठी कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची सत्यता पडताळून त्याच्यावर महापुरुषांचा अपमान करून सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याच्यावर गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देतांना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जीवन बागड, कार्याध्यक्ष प्रा .डॉ. देवेश कांबळे, इंजि. मिलिंद मेश्राम, विजय पाटील उपस्थित होते.