महिलांनी पकडली अवैध दारू : तालुक्यात अवैध दारूविक्री जोरात

सावली (प्रतिनिधी) : तालुक्यातील चकपिरंजी येथील महिलांनी अवैध देशी दारू पकडून पोलीस प्रशासनाला आवाहन केल्याचा प्रकार (दि 12) च्या सकाळच्या सुमारास घडला.

चंद्रपूर जिल्ह्यात दारू सुरू होऊन दोन वर्षाचा काळ लोटत आहे. ग्रामीण भागात अवैध दारू विकण्याचा सपाटा सुरू आहे. परवानाधारक देशी भट्टी, वाईन शॉप मधून ग्रामीण भागात विक्रीसाठी अवैध दारू पुरवल्या जात असल्याची ओरड आहे. अनेक तक्रारी सुद्धा करण्यात आल्या. मात्र यावर प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याने शेवटी महिलांनी पुढाकार घेऊन परिसरात येत असलेली अवैध दारू पकडून पोलीस प्रशासनाला एका प्रकारे आव्हानच केले आहे. रात्रौ -बेरात्री, तर आता दिवसाही अवैध दारू विक्रीचा सर्रास प्रकार उघडकीस येत आहे. अवैध दारू विक्रीला पाठबळ कुणाचे? राजकारण्यांचे की अधिकाऱ्यांचे? हा प्रश्न निरुत्तरीच आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात अवैध दारू विक्रेते तयार झाले असून त्यांना परवानाधारक वाईन शॉप दारूभट्ट्यामधूनच दारूचा पुरवठा केला जात आहे. मात्र याकडे संबंधित प्रशासनाचा कानाडोळा होत असल्याची चर्चा परिसरात ऐकावयास मिळत आहे.

त्यामुळे चकपिरंजी येथील महिला एकत्रित येऊन गावात येणाऱ्या 90 एम एल च्या 38 बाटला पकडून अवैध दारू विक्रेत्यांना चपराक दिली आहे. यावेळी ग्रा प सदस्य अरविंद भैसारे, अम्रुत चौधरी, मेहमूद शेख, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश लाटकर, शारदा मगरे, ललिता दडमल, उषा मगरे, लक्ष्मी कोडापे, ज्योती दडमल, गीता कोलते आदी महिला उपस्थित होत्या.