दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात कार उलटली

चिमूर (प्रतिनिधी) : विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात कारचे नियंत्रण सुटून ती रस्त्याच्या कडेला खड्डयात उलटली. भंडारावरून चिमूरकडे येत असलेले चारचाकी वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालेवाडाजवळ उलटले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. एकजण किरकोळ जखमी झाला तर तिघे या अपघातातून सुरक्षित बचावले.

भंडारावरून मोटघरे कुटुंब चारचाकी वाहन आय टेन ग्रँड क्रमांक (एमएच ३६, एच ७४५१) ने काम्पावरून चिमूरमार्गे चंदनखेडा येथे जात होते. परंतु दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात चारचाकी वाहन रस्त्याच्या बाजूला पलटी झाले. यात विठाबाई मोटघरे (५१) या किरकोळ जखमी झाल्या. गाडीतील तिघे भाऊ मात्र सुदैवाने बचावले. जखमी विठाबाई यांना उपजिल्हा रुग्णालयात भरती केले आहे. या अपघातादरम्यान भाजप तालुकाध्यक्ष राजू झाडे व तालुका महामंत्री प्रशांत चिडे हे त्याच रस्त्याने प्रवास करीत असल्याने त्यांनी घटनास्थळी गाडी थांबवून मदतकार्य करत जखमीला उपजिल्हा रुग्णालयात स्वतःच्या वाहनाने पाठविले.