बल्लारपुरात टेकडी भागासाठी नवीन मोक्षधाम निर्माण करा

नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन सादर
 संत गाडगेबाबा जनसेवा संस्थेची मागणी

विसापूर  (प्रतिनिधी) : बल्लारपूर नगरपालिका शहर सर्वात मोठे आहे. येथील लोकसंख्या लाखावर आहे. मात्र नागरिकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी वर्धा नदीच्या तिरावर एकच मोक्षधाम आहे. यामुळे नागरिकांना आप्तेष्टावर अंत्यसंस्कार करताना अडचणीचा सामना करावा लागतो. यातून मार्ग काढण्यासाठी बल्लारपूर शहरातील टेकडी भागात नवीन मोक्षधाम निर्माण करावे, असी मागणी श्री संत गाडगेबाबा जनसेवा संस्थेच्या वतीने बल्लारपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

बल्लारपूर शहराची ओळख मिनी भारत म्हणून केली जाते. औद्योगीक शहर म्हणून जागतिक दर्जाचा पेपर उद्योग, कोळसा खाण, वन विभागाचे आगार आणि राज्याची सीमा बदलणारे रेल्वे स्थानक आहे. यामुळे दिवसेंदिवस लोकसंख्येत वाढ होत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत शहरात केवळ वर्धा नदीच्या तिरावर एकच मोक्षधाम आहे. यामुळे नागरिकांना आप्तेष्टावर अंत्यविधीला जाताना मोठा त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून टेकडी भागात नवीन दुसरे मोक्षधाम निर्माण करणे गरजेचे आहे, असे श्री संत गाडगेबाबा जनसेवा संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार, विकास राजूरकर आणि वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांनी निवेदनात म्हटले आहे.

मानवी जीवनात जन्म आणि मृत्यूचा फेरा अटळ आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाने शहर विस्तारानुसार दुसरे मोक्षधाम निर्माण केले नाही. परिणामी टेकडी भागातील नागरिकांना आजही ४ ते ५ किमी चा प्रवास अंत्ययात्रेसाठी करावा लागत आहे. ही गैरसोय नागरिकांना भोगावी लागत आहे. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासनाने टेकडी भागात दुसऱ्या नवीन मोक्षधामाची निर्मिती करून समस्येवर मार्ग काढावा, असी आग्रही मागणी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे. निवेदन सादर करताना श्री संत गाडगेबाबा जनसेवा संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार, विकास राजूरकर, प्रशांत भोरे, ज्ञानेद्र आर्य, वैभव मेनेवार यांची उपस्थिती होती.