नायब तहसीलदार संवर्गातील पदोन्नतीचा मार्ग मोकळा

महसूल कर्मचारी संघटनेच्या मागण्या शासनस्तरावर मान्य
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शिष्टाईने संप मिटला

विसापूर ( चंद्रपूर ) : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने न्याय मागण्यासाठी ४ एप्रिल पासून राज्यभर संप केला. तब्बल आठ दिवस संपामुळे नागरिकांना कामाबाबत वेठीस धरले होते. यावर तोडगा निघावा म्हणून राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अप्पर मुख्य सचिव डाँ. नितीन करीर यांच्यात यशस्वी शिष्टाई झाली. शासन सेवेतील अव्वल कारकून तथा मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती देण्याचा मार्ग मोकळा झाला असून १० मे २०२१रोजीच्या शासन निर्णयातील जाचक अटी रद्द केल्या. परिणामी महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप मागे घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी १३ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता मुंबई मंत्रालयात महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत महसूल कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या मागण्यासाठी आग्रह धरला. त्यांच्या आग्रही भूमिकेमुळे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सकारात्मक निर्णय घेतला. पदोन्नत नायब तहसीलदार संवर्ग राज्यस्तरीय न करता, तो विभागीय स्तरावरच कायम राहील. महसूल प्रशासनातील रिक्त पदांचा भरणा करण्याबाबत लवकरच भरती प्रक्रिया सुरु करण्यात येईल.१० मे २०२१ च्या शासन निर्णयातील जाचक अटी शिथिल करून सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याचे ठोस निर्णय घेण्यात आल्यामुळे मागील आठ दिवसापासून सुरु असलेला महसूल कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संप मागे घेत असल्याची घोषणा कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने २३ मार्च पासून वेगवेगळ्या टप्प्यातील न्याय मागण्यासाठीचे आंदोलन तब्बल १३ एप्रिल पर्यंत चालले.४ एप्रिल पासून सुरु झालेल्या बेमुदत संपामुळे महसूल प्रशासनातील उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयातील नागरिकांचे दैनंदिन कामे प्रभावित झाले. कामाच्या खोळंब्यामुळे महसूल विभाग अडचणीत आला. आता मात्र संप मिटल्यामुळे जनतेची प्रलंबित कामे अधिक वेगाने करण्यात येणार आहे, असे चंद्रपूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र धात्रक, सरचिटणीस मनोज आकनूरवार, उपाध्यक्ष अजय मेकलवार, विभागीय अध्यक्ष राजू धांडे, नितीन पाटील, प्रणाली खीरटकर, संजना झाडे, अमोल आखाडे, सोनाली लांडे, राकेश जांभुळकर, विष्णू नागरे, गजानन उपरे आदीं पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. महसूल कर्मचारी संघटनेने संपाचे हत्यार जनतेच्या बळावर पुढे केले. जनतेच्या विश्वासावर संप यशस्वी केला. शासनाने आमच्या मागण्या तत्वतः मान्य केल्या आहे. यानंतर महसूल प्रशासनातील दैनंदिन कामे नियमित सुरु राहतील, असे अजय मेकलवार यांनी सांगितले.