चंद्रपूर {प्रतिनिधी} : सिकलसेल या दुर्धर आजारावर जनजागृती करण्याच्या दृष्टीने चंद्रपुरात 19 जून रोजी चांदा वॉक फॉर सिकलसेल या विशेष पद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर विशेष जनजागृती पद यात्रा सकाळी तुकुम परिसरातील पोलीस फुटबॉल मैदानातून निघेल. जटपूरा गेट ला वळसा घालून ती परत प्रारंभ स्थळी विसर्जित करण्यात येईल.
सिकल सेल अँड थालेसिमिया सोसायटी ऑफ चंद्रपूर या संस्थे अंतर्गत हे विशेष आयोजन करण्यात आले असुन यात विविध सामजिक आणि सेवाभावी संस्था स्वप्रेरणेने सामील होतील. सोबतच पीडितही यात भाग घेणार असल्याची माहिती संस्था सचिव रुपल अरुण उराडे यांनी दिली आहे.
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात या आजाराचे प्रमाण गंभीर असुन त्या तुलनेने शासकीय व प्रशासकीय स्तरावरून योग्य कार्यवाही तोकडी आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जनजागृती हा एक व्यापक उपाय असुन याकामी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन रूपल उराडे यांनी केले आहे.