हडस्ती व चारवट गावाला बेटाचे स्वरूप : सततच्या पुराने शेतकऱ्यांची केली दैना
अनेकेश्वर मेश्राम, बल्लारपूर
तालुक्यात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पुराने थैमान घातले. या दरम्यान चारदा वर्धा व इरई नदीने पूर परिस्थिती निर्माण केली. परिणामी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला.यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच दैना झाली. मंगळवारी पुन्हा एकदा वर्धा व इरई नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पुरामुळे बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती व चारवट गावाला वेढा दिला आहे. पाचव्यांदा आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठा फटका बसला आहे.
बल्लारपूर तालुक्यात पाचव्यांदा आलेल्या पुरामुळे विसापूर – बल्लारपूर, विसापूर – नांदगाव (पोडे ), माना – चारवट, हडस्ती मार्गासह बल्लारपूर – सास्ती, बामणी – राजुरा वर्धा नदीच्या पुलावर पुराचे पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, नांदगाव (पोडे ), हडस्ती, चारवट, बामणी (दुधोली ), दहेली, लावारी, कळमना, आमडी, पळसगाव, कोठारी, किन्ही, काटवली (बामणी ), कवडजई, आदी गावातील शेतीचे पाचव्यांदा आलेल्या पुराने अतोनात नुकसान झाले आहे. वर्धा व इरई नदीच्या पात्रालगत शेती पूर्णपणे पुराच्या पाण्याखाली आल्यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.
हडस्ती व चारवटचा संपर्क तुटला
आठवड्याच्या विश्रांती नंतर वर्धा व इरई नदीने पाचव्यांदा काढलेल्या पुरामुळे बल्लारपूर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील हडस्ती व चारवटचा संपर्क तुटला आहे. मंगळवारी या गावातील नागरिकांना पुरामुळे पाचव्यांदा मोठा फटका बसला आहे. यावर्षी सततच्या पुरामुळे तेथील नागरिकांची दैना झाली आहे. वर्धा व इरई नदी जीवावर उठल्याची भावना नागरिकांत निर्माण झाली आहे. जुलै महिन्यात एका आजारी महिलेला मध्यरात्रीच्या सुमारास रेस्क्यू ऑपरेशन करून दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्याची वेळ प्रशासनावर आली होती.
वर्धा नदीच्या प्रकोपाने बळीराजा हवालदिल
बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना यावर्षी अतिवृष्टीचा वेळोवेळी सामना करावा लागत आहे. येथील बहुतेक कृषी क्षेत्र कोरडवाहू असून कृषी व्यवसाय निसर्गाच्या जलचक्रावर अवलंबून आहे.मात्र पुरामुळे शेतकऱ्यांची पुरती दैना केली आहे. तालुक्यात एकूण खरीपाचे कृषी क्षेत्र ७ हजार ८८६ हेक्टर इतके आहे. यातील ५ हजार पेक्षा अधिकचे कृषी क्षेत्र सततच्या पुरामुळे नेस्तनाबूत झाले आहे. शेतीचे पंचनामे होत नाही, तर पाचव्यांदा आलेल्या पुराने बळीराजाचा भ्रमनिरास झाला. संपूर्ण खरीप हंगाम हातातून गेल्याने बळीराजा हवालदिल झाले आहे.