यश प्राप्तीसाठी अभ्यासाचे सूक्ष्म नियोजन करायला शिका : तारकेश्वर मैंद

ब्रम्हपुरी (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विद्यार्थी योग्य मार्गदर्शनाच्या अभावी अभ्यासाचे नियोजन करीत नसल्याने स्पर्धा परीक्षांमध्ये हवे ते यश प्राप्त करू शकत नाही.स्पर्धा परीक्षेत यश प्राप्तीसाठी अभ्यासाचे सूक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन गडचिरोली येथील विक्रीकर अधिकारी तारकेश्वर मैंद यांनी शिबिराच्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून केले.

राज्यात विविध जागांकरिता शासनातर्फे पदभरती सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी या भरती प्रक्रियेत मोठ्या संख्येने स्पर्धेची तयारी करीत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे व त्यातून यश प्राप्त व्हावे या हेतूने निलज येथील पत्रकार विनोद चौधरी, सरपंच हेमंत ठाकरे, सामाजिक कार्यकर्ता अशोक भुते यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व अध्यक्ष गडचिरोली येथील विक्रीकर अधिकारी तारकेश्वर मैंद हे होते. प्रमुख अतिथी सरपंच हेमंत ठाकरे, उपसरपंच शंकर कोपुलवार, प्रा. देवा ठाकरे, संजय भांडे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून इन्स्पायर करिअर अकॅडमी ब्रह्मपुरीचे संचालक प्राध्यापक लक्ष्मण मेश्राम, महिला पोलीस कीर्ती बगमारे, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार प्रशांत डांगे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच हेमंत ठाकरे यांनी केले, संचालन तेजस बगमारे यांनी केले तर आभार पत्रकार विनोद चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रज्योत पिलारे, सचिन ढोरे, भोपाल बांकमवार, कार्तिक बगमारे व युवकांनी सहकार्य केले.