सरकारने ९८ वेळा कायद्यांचा भंग केला

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा घणाघात

मुंबई :  महाविकास आघाडी सरकारने लोकशाहीचा खूनच केला. आमदारांचे निलंबन असो की ‘वैधानिक’वरील नियुक्त्या रखडविण्याचा मुद्दा, अशा तब्बल ९८ वेळा महाविकास आघाडी सरकारने कायद्यांचा भंग केलाय, असा घणाघात विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

सरकारचा हा नियमभंग पाहता एखाद्या न्यायालयात जर हे मुद्दे गेले किंवा संवैधानिक दृष्ट्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, अशी परिस्थिती आहे, असे आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. महाविकास आघाडी सरकार आणि लोकशाही यांचा आपसांत काहीच संबंध नाही. लोकशाहीचे, संविधनाचे पालन करणारे हे सरकारच नाही, असे ते म्हणाले. विधान सभा अध्यक्ष निवडीवर, बारा आमदारांच्या निलंबनावर, वैधानिक महामंडळांच्या नियुक्त्यांवर, भ्रष्टाचाराबाबत, शेतकरी आत्महत्या, कायदा व सुव्यवस्था, महिलांवरील अत्याचार, विविध मंत्र्यांचा भ्रष्टाचार, परीक्षा घोटाळे, कोविड परिस्थिती आदी सर्व मुद्द्यांबाबत महाविकास आघाडी सरकार पूर्णत: अपयशी ठरल्याचेही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ठामपणे नमूद केले.