वर्षभरात 3 कोटीची दारू जिल्हा पोलिसांच्या ताब्यात

गडचिराेली : पाेलीस प्रशासनाने २०२१ या वर्षात जिल्हाभरात ३०१ कारवाया करून ३९२ दारूविक्रेत्यांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे २ काेटी ९४ लाख ३० हजार रुपयांची दारू व अन्य साहित्य जप्त केले आहेत.
गडचिराेली जिल्ह्यात १९९३ पासून दारूबंदी करण्यात आली आहे. तरीही नजीकच्या भंडारा, गाेंदिया, चंद्रपूर जिल्हे तसेच छत्तीसगड व तेलंगणा राज्यातून दारू आणून विकली जाते. अवैध दारूची विक्री, वाहतुक हा काही नागरिकांचा राेजगारच बनला आहे. अवैधरित्या आणलेली दारू दामदुप्पट दराने विक्री केली जाते. तसेच त्यामध्ये काही प्रमाणात भेसळही केली जाते. यातून दारू तस्कर गब्बर हाेत असले तरी अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त आहेत आहेत. दारूविक्री व वाहतुकीला आळा घालण्यासाठी पाेलीस विभाग प्रयत्न करीत असला तरी पाेलिसांच्या डाेळ्यात धूळ झाेकून दारूविक्री केली जाते. पाेलिसांमार्फत विविध ठिकाणी सापळा रचून कारवाई केली जाते.
गाेपनीय सुत्रांकडून माहिती काढून पाेलीस विभागामार्फत सापळे रचले जात असले तरी पाेलिसांनाही गुंगारा देत दारू वाहतूकदार दारूविक्रेत्यांपर्यंत दारू पाेहाेचवितात. त्यामुळेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्थळी व माेठ्या गावांमध्ये खुलेआम दारू मिळते.

देशी बंद असताना माेहाच्या दारूवर भर
चंद्रपूर जिल्ह्यात शासनाने जवळपास सहा वर्षे दारूबंदी केली हाेती. राज्य शासनाने २७ मे २०२१ राेजी दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. चंद्रपूर जिल्ह्याची सीमा गडचिराेली जिल्ह्याला लागून आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून येणारी दारू बंद झाल्याने येथील दारूशाैकीन माेहफुलाच्या दारूकडे वळले. दुर्गम भागात माेहफुलाची दारू वर्षभर काढली जाते. ग्रामीण भागातील काही नागरिक या दारूची विक्रीसुद्धा करतात.

युवकांना गांजाचाही छंद

– गांजा पिणे व विक्रीवर राज्यभरात बंदी असली तरी याचीही तस्करी जिल्ह्यात केली जाते. गांजाच्या आहारी प्रामुख्याने युवक गेले असल्याचे दिसून येते. पाेलीस विभागाने वर्षभराच्या कालावधीत २७ हजार २२० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. जिल्ह्यात गांजा पिणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने गांजाच्या विक्रीवर पाेलीस विभागाने करडी नजर ठेवण्याची गरज आहे.