महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार !

                              महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कार्याने अनोखी ओळख निर्माण करण्याचे कार्य यशवंतराव चव्हाणांच्या बरोबरीने मारोतराव कन्नमवारांनी केले. मात्र, त्याच कन्नमवारांचा विसर काँगेस पक्षांसह संबंध महाराष्ट्राला पडावा यासारखे दुर्दैव दुसरे असू नये. विदर्भाच्या भूमीतील पहिल्या वहिल्या नेतृत्वाचा आम्हाला विसर पडतो की आम्ही इतिहास सोयीस्कर वापरतो? असा प्रश्न आता कन्नमवार प्रेमींमधून विचारला जात आहे. घराण्याचा फार मोठा वारसा नसलेली, आर्थिक स्थिती जेमतेम, वृत्तपत्रे विकून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकणारा सामान्य माणूस देखील आपल्या अविरत सेवेने मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचू शकतो, त्याचे उत्कृष्ट आणि आदर्श उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील मारोतराव सांबशिवपंत कन्नमवार हे होय. चंद्रपुरातील सांबशिवपंत व गंगूबाई यांच्या पोटी १0 जानेवारी १९00 रोजी मारोतरावांचा जन्म झाला. साधारणपणे हातात सत्ता आली की लोक आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु दादासाहेब कन्नमवार याला अपवाद होते. हातात सत्ता आली की, ती सत्कारणी कशी लावावी, पैसा आला की त्याचा जनकल्यानार्थ उपयोग करून आपला प्रदेश अधिक संपन्न कसा करावा? ही कला त्यांनी उत्कृष्ट साधली होती.
महाराष्ट्राच्या विकासाच्या पहिल्या तीन पंचवार्षिक योजनेच्या (पहिली ते तिसरी) काळात दादासाहेब कन्नमवार, आरोग्यमंत्री, बांधकाममंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री अशा पदावर कार्यरत होते. कन्नमवारांनी जनकल्यानार्थ विविध क्षेत्रातील भरपूर कामे केली. त्या कार्यात प्रामुख्याने चंद्रपूर येथे अन्नधान्याचे गोदाम, भद्रावती, गोवर्धन, नागभीड, वडसा, नवरगाव येथे अँलोपॅथी दवाखान्याची व्यवस्था, दिना नदीवरील धरण, ताडोबा सरोवरालगतच्या वनाचे प्रसिध्द ताडोबा उद्यान बनविले. उमरेडला कोळशा खाण तर वैनगंगा नदीच्या तीरावर असलेल्या प्रसिद्ध मार्कंडा या तीर्थक्षेत्री शुद्ध पाणी, नळ योजना, वीज पुरवठा उपलब्ध करून दिला. मध्य प्रांतातील सरकारमध्ये आरोग्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडत असताना नागपूर येथे सर्वात मोठे मेडिकल रुग्णालय उभारले. दादासाहेब कन्नमवारांनी अनेक लोकोपयोगी कामे हाती घेतली. पैसा प्रांतीय सरकारकडून असो की केंद्रीय सरकारकडून असो, मिळेल तेथून तो मिळवायचा व जेथे गरज आहे तेथे जनकल्यानार्थ उपयोगात आणावयाचा हेच त्यांचे विकासाचे धोरण होते.
दादासाहेब कन्नमवार ६ व्या इयत्तेत असताना लोकमान्य टिळक होमरूल दौर्‍यानिमित्त १५ फेब्रुवारी १९१८ रोजी चंद्रपुरात आले होते. लोकमान्य टिळकांचे देशभक्तीने ओथंबलेले भाषण ऐकून त्या भाषणाचा कन्नमवारावर इतका प्रभाव पडला की कन्नमवारांनी त्यादिवसापासून देशसेवेची दीक्षा घेतली. तसेच त्यांची शाळेतील पुढाकाराची भूमिका बघता अगदी लहानपणापासून स्वयंसिद्ध नेतेपणा व संघटक कौशल्याचे बीज त्यांच्या अंगी रुजलेले आढळते. कन्नमवार अलाहाबाद विद्यापीठात मॅट्रिक परीक्षेला बसले होते. गणित विष? कच्चा असल्याने नापास झाले. कोलकाता विद्यापीठात गणित विषय सोपा असल्याचे कळल्याने त्यांनी तेथे जाण्याचे ठरविले. शिक्षणासाठी कोलकत्याला निघाल्यावर वर्धा स्टेशनवर टिळकांच्या निधनाची बातमी कळली, डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या, त्यांना वाटायला लागले की, किती दुदैर्वी! इकडे लोकमान्य टिळकांचे निधन व्हावे आणि मी गुलामगिरीचे शिक्षण घेण्याकरिता कोलकत्यास जावे. असे कितीतरी विचार त्यांच्या मनात येत होते आणि या विचारातच ते कोलकत्याला पोहचले. पण त्यांचे मन रमेना शेवटी आता मॅट्रिकची परीक्षा देण्यात काही अर्थ नाही, आयुष्यात स्वतंत्र राहून देशसेवा करावी असे त्यांनी ठरवून टाकले आणि अभ्यासाला पूर्णविराम दिला, हीच त्यांच्या राजकीय जीवनाची व कार्याची सुरुवात होय.
१ मे १९६0 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळातही मध्य प्रांतातील अनुभव बघता दादासाहेब कन्नमवारांचा समावेश करण्यात आला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासोबत दळणवळण, बांधकाम हे खाते सोपविण्यात आले. अशाप्रकारे दादासाहेब कन्नमवार संयुक्त महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर चीनने १९६२ मध्ये युध्द घोषणा न करताच भारतावर थेट आक्रमण केले. देशावर आलेल्या या संकटाच्या घडीत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कठोर निर्णय घेणारा गृहमंत्री हवा होता. तेव्हा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना केंद्रात बोलावून संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सोपविली आणि यशवंतराव चव्हाणांचे उत्तराधिकारी म्हणून महाराष्ट्राची सूत्रे दादासाहेब कन्नमवार यांच्या हाती सोपविली. महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून २0 नोव्हेंबर १९६२ रोजी राजभवनातील जलनायक या इमारतीसमोर महाराष्ट्राचे हंगामी राज्यपाल न्यायमूर्ती चैनानी यांच्याकडून महाराष्ट्र राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. मुख्यमंत्री पदावर येताच दादासाहेब कन्नमवारांनी राष्ट्रीय संरक्षणनिधीकरिता भरभक्कम आघाडी उभारली. प्रत्येक मंत्री- उपमंत्र्याकडे जिल्हाची जबाबदारी विभागून दिली. केंद्राकडून तसेच आपल्या राष्ट्रीय नेत्याकडून येणारा प्रत्येक आदेश कार्यान्वित करून कोट्यावधी रुपयांचा निधी व सोने गोळा केला. हा संरक्षण निधी गोळा करण्यासाठी जनसंपर्क, सहामाही कार्यक्रम, क्रिकेट मॅच, र्शमदान सप्ताह, हमारा हिमालय प्रदर्शन, वृक्षारोपण कार्यक्रमाचा समावेश होता.
दादासाहेब कन्नमवार लहानपणापासूनच क्रिकेटचे शौकीन होते. लहानपणी ते आईसोबत जंगलात जाऊन लाकडे तोडून आणीत व त्याच्या बॅटस बनवीत, वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांना पुन्हा देशाच्या संरक्षणासाठी बॅट हातात घेण्याची इच्छा झाली. १७ मार्च १९६३ ला मुंबई येथे बॉम्बे जिमखाना मैदानावर मुख्यमंत्री संघ व महापौर संघ यांच्यात क्रिकेटचा सामना झाला. या सामनाद्वारे २५ लाखावर निधी गोळा झाला. त्यावेळी मंत्री संघाच्या वतीने मुख्यमंत्री मा. सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांनी तर महापौर संघाचे वतीने महापौर एम.एन.शाह यांनी संघाचे नेतृत्व केले. देशाच्या संरक्षण निधीकरिता क्रिकेट खेळणारा भारतातील एकमेव मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार होते.
आपल्या देशात वाढदिवस साजरा करण्याची प्रथा फार जुनी आहे.आधुनिक भारतात मात्र काही पुढार्‍यांचे जन्मदिवस विशिष्ट नावाने साजरे केले जातात. उदा. पंडित जवाहरलाल नेहरूचा बालकदिन, राष्ट्रपती डॉ.राधाकृष्णन यांचा शिक्षकदिन, आचार्य विनोबा भावे यांचा भूदानदिन त्याचप्रमाणे १0 जानेवारी हा कन्नमवारांचा जन्मदिन ग्रामजयंती म्हणून साजरा व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्यांचा वाढदिवस पहिल्यांदा ते मध्य प्रांताचे आरोग्यमंत्री झाल्यानंतर ५६ व्या वाढदिवशी साजरा करण्यात आला होता. कन्नमवारांनी जनतेची जी सेवा केली, त्या सेवेचा गौरव करावा म्हणून मध्य वर्‍हाड प्रांतातील जनतेने १९५६ साली १0 जानेवारीला त्यांचा वाढदिवस नागपूर येथे पंडित कुंजी लाल दुबे यांच्या अध्यक्षतेखाली भोसले नाट्यगृह, महाल येथे साजरा केला. तेव्हा ते म्हणाले, माझाच वाढदिवस का? माझ्यासारखे अन्य लाखो लोक आहेत, त्यांचे वाढदिवस का साजरे होऊ नयेत? त्यांच्यात व माझ्यात काय फरक आहे? म्हणून माझ्या एकट्याचाच वाढदिवस साजरा न करता संपूर्ण गावाचा वा नगराचा वाढदिवस साजरा करण्यात यावा व त्यास ग्रामजयंती संबोधण्यात यावे, तरच त्यात मला समाधान राहील. अशा या महामानव कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचे जन्मशताब्दी वर्ष केव्हा सुरू झाले आणि संपले आहे, हे राज्यकर्त्याच्याच नव्हे, तर मराठी जनतेच्याही लक्षात आले नाही. आज दादासाहेबांची १२१ वी जयंती आहे. मात्र आजही काँग्रेस पक्ष, राज्य सरकार व मराठी जनतेला दादासाहेब कळू नये? त्याविषयी चार शब्दांची माहिती त्यांना असू नये? राज्यकर्त्यांच्या तोंडी त्यांचा साधा उल्लेख येऊ नये? यासारखे दुसरे दुर्भाग्य असू शकत नाही. दादासाहेबांच्या सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त तरी राज्य शासनाने दादासाहेबांच्या कार्यावरील पुस्तक, लघु चित्रपट काढून दादासाहेबांचे कार्य जनमानसात रुजवावे एवढी माफक अपेक्षा आहे.

मा. सा. कन्नमवार जयंतीनिमित्त दे धक्का एक्सप्रेसच्या वतीने विनम्र अभिवादन!